देवीदास पिंगळे यांच्या त्र्यंबकपिंप्रीच्या फार्म हाउसवर धाड
By Admin | Updated: December 24, 2016 01:18 IST2016-12-24T01:18:26+5:302016-12-24T01:18:46+5:30
लॉकर ताब्यात : ‘एसीबी’ने आवळला फास

देवीदास पिंगळे यांच्या त्र्यंबकपिंप्रीच्या फार्म हाउसवर धाड
नाशिक : कर्मचाऱ्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेत बेहिशेबी रोकड प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांना अटक केली असून, रोकडच्या शोधासाठी त्यांच्या मालमत्तेचे झडतीसत्र सुरूच आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. २३) त्र्यंबकपिंप्रीच्या फार्म हाउसवर धाड टाकली. विशेष बाब म्हणजे या फार्म हाउसचा शोध सदर कारवाईमुळे लागल्याची चर्चा आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंगळे यांना अटक करून गुरुवारी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पिंगळे यांच्या स्थावर व जंगम मालमत्तांचा शोध आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून घेतला जातो आहे. बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याच्या रकमेवर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून परस्पर डल्ला मारल्याचा आरोप पिंगळे यांच्यावर असून, त्यांना याच गुन्ह्णात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयापुढे पाच कर्मचाऱ्यांचा गोपनीय कबुली जबाबही नोंदविण्यात आला असून, या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे सबळ पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पिंगळे यांच्या सहभागाचा पूर्णत: छडा लावून गुन्ह्याचा तपास करत न्यायालयापुढे पुरावे सादर करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंगळेंच्या संपत्तीचा ठावठिकाणा घेण्यास सुरुवात केली आहे.
या मोहिमेदरम्यान शुक्रवारी पिंप्रीच्या फार्महाउसचीदेखील झडती घेण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिळणारे उत्पन्न व त्यांच्या नावे असलेल्या मालमत्तेचा ताळमेळ कोठे बसतो का, हा तपासाचा मुख्य भाग आहे. पिंगळेंना अटक केल्यानंतर एसीबीने शहरातील एका घरासह फार्महाउसची झडती घेतली आहे. पिंप्रीच्या फार्महाउसची कुणकुण लागल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने फार्महाउसच्या दिशेने मोर्चा वळविला. याठिकाणी शुक्रवारी दिवसभर कारवाईची प्रक्रिया सुरू होती. कारवाईदरम्यान काय हाती लागले ते अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.(प्रतिनिधी)