‘युद्धाचा देव’गरजला; देवळालीत स्कुल ऑफ आर्टिलरीचे शक्तीप्रदर्शन....!

By अझहर शेख | Updated: January 21, 2025 17:59 IST2025-01-21T17:32:42+5:302025-01-21T17:59:52+5:30

भारतीय सैन्यदलाच्या पाठीचा कणा असलेल्या तोफखान्याचे शक्तीप्रदर्शनाने शत्रूच्याही उरात धडकी भरविली.

God of War' roared; School of Artillery's show of strength in Devlali | ‘युद्धाचा देव’गरजला; देवळालीत स्कुल ऑफ आर्टिलरीचे शक्तीप्रदर्शन....!

‘युद्धाचा देव’गरजला; देवळालीत स्कुल ऑफ आर्टिलरीचे शक्तीप्रदर्शन....!

 नाशिक : युद्धाचा देव मानल्या जाणाऱ्या तोफखान्यातील अत्याधुनिक तोफांमधून गनर्सकडून दागण्यात आलेले बॉम्बगोळे अन् अचूक लक्ष्यभेदाने नाशिकच्या देवळाली येथील स्कुल ऑफ आर्टिलरीच्या शिंगवे बहुला फायरिंग रेंज मंगळवारी (दि.२१) दणाणली. भारतीय सैन्यदलाच्या पाठीचा कणा असलेल्या तोफखान्याचे शक्तीप्रदर्शनाने शत्रूच्याही उरात धडकी भरविली.

धनुष, बोफोर्स (१५५एमएम), के-९वज्र, अल्ट्रा लाइट होवित्झर (एम७७७), सॉल्टम, १५०एमएम लाइट फिल्ड गन, १३० एम.एम मिडियम गनसह मल्टी बॅरेल ग्रॅड बीएम रॉकेट लाँचरद्वारे अवघ्या १२सेकंदात एकापाठोपाठ एक सोडण्यात आलेल्या मिसाइलने लक्ष्य उद्ध्वस्त केले. निमित्त होते, देवळाली कॅम्प येथे स्कुल ऑफ आर्टिलरीच्या वतीने मंगळवारी (दि.२१) युद्ध सराव अभ्यास प्रात्याक्षिकाचे (तोपची) सादरीकरण करण्यात आले. या प्रात्याक्षिक सोहळ्याचे नेतृत्व स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमाडंट व रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे वरिष्ठ कर्नल कमाडंट अति विशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट नवनित सिंग सरना यांनी केले. यावेळी विशेष अतिथी म्हणून नेपाळ सैन्य दलाचे ब्रिगेडियर मनोज थापा यांच्यासह अन्य लष्करी अधिकारी उपस्थित होते.

स्वदेशी, विदेशी बनावटीच्या अत्याधुनिक तोफांच्या अचूक माऱ्याने स्कुल ऑफ आर्टिलरीच्या गनरकडून पुन्हा एकदा स्वत:ची क्षमता सिद्ध करून दाखविली. अवघ्या काही सेकंदात निश्चित केलेले ‘लक्ष्य’ बॉम्ब हल्ल्याने उद्ध्वस्त केले, यावेळी तोफांच्या मारक क्षमतांचा प्रत्यय उपस्थितांना हादरवून सोडणारा होता. जवानांच्या कुटुंबीयांकडून यावेळी टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला. नेपाळसह अन्य मित्र राष्ट्रांचे सैनिकदेखील डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या अशा या अद्भूत सोहळ्याचे साक्षीदार ठरले. सोहळ्याचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

 नऊ तोफांसह रॉकेट लॉन्चरकडून ‘टार्गेट’ नेस्तनाबूत 

कोनहिल टॉप, हाथीमाथा, बहुला-१, बहुला-२, माउंड, हर्बरा, टेम्पल, ओपन पॅच, वॉल, व्ही-कट, हम्प, सगमाथा अशी नावे फायरिंग रेंजमधील सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगरांवरील टार्गेटला देण्यात आलेली होती. प्रत्येक तोफांसाठी वेगवेगगळे लक्ष्य निश्चित केलेले होत. हे सर्व लक्ष्य तोफांनी अचूकरित्या भेदून नेस्तनाबूत केले.

Web Title: God of War' roared; School of Artillery's show of strength in Devlali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.