जखमी सांबराला मिळाले जीवदान
By Admin | Updated: March 20, 2015 00:06 IST2015-03-19T23:37:31+5:302015-03-20T00:06:40+5:30
लवटे यांची माणुसकी : वणी-ओझरखेड दरम्यान सापडले सांबर

जखमी सांबराला मिळाले जीवदान
नाशिकरोड : वणी-ओझरखेड दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेने बुधवारी मध्यरात्री जखमी होऊन विव्हळत पडलेल्या एका सांबरास अनुराधा फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष राजू लवटे यांनी आपल्या वाहनातून नाशिकला पहाटे वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. त्वरित उपचार मिळाल्याने त्या सांबराला जीवदान मिळाले आहे.
नाशिकरोड येथील अनुराधा फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष राजू लवटे हे आपला गाडीचालक संतोष निरभवणे याच्यासह बुधवारी रात्री साडेअकरा सुमारास सापुताऱ्यावरून नाशिकला येत होते. वणी-ओझरखेड दरम्यान वनविभागाचे मोठे क्षेत्र असून, जंगल आहे. लवटे येत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला अंधारात एक प्राणी जखमी अवस्थेत तडफडत असल्याचे दिसले. लवटे यांनी गाडी पुन्हा माघारी फिरविली असता त्यांना एक सांबर अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी झालेले दिसून आले. त्याच्या पायाला गंभीर इजा झालेली होती. लवटे यांनी तत्काळ त्या जखमी सांबराला आपल्या गाडीत व्यवस्थित ठेवले. लवटे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फोन करून माहिती देत वन विभागाचा नंबर मागितला. मात्र दिंडोरी पोलिसांकडे नंबर नसल्याने लवटे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फोन करून नाशिकच्या कार्यालयाचा फोन नंबर मिळविला. पहाटे ३ वाजेच्या सुमारास लवटे यांनी त्या जखमी सांबरास वनविभागाचे लिंबेकर यांच्या ताब्यात दिले. येत्या रविवारी पुणे येथील डॉक्टर आल्यावर त्या जखमी सांबराच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. (प्रतिनिधी)