तीन भाविकांवर काळाचा घाला
By Admin | Updated: September 13, 2015 23:47 IST2015-09-13T23:47:19+5:302015-09-13T23:47:48+5:30
बापलेकीसह काकाचा मृत्यू : स्नान आटोपून जाताना रासेगावजवळ कारला अपघात

तीन भाविकांवर काळाचा घाला
नाशिक : सिंहस्थ पर्वणीचे स्नान आटोपून सिल्वासाला परतणाऱ्या पारीख कुटुंबीयांच्या सॅन्ट्रो कारला रविवारी (दि़ १३) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रासेगावजवळ भीषण अपघात झाला़ यामध्ये कारच्या पुढील सिटवर बसलेल्या तिघांचा मृत्यू झाला असून, पाठीमागे बसलेल्या महिलेसह तिची आठ वर्षांची मुलगी व कुटुंबातील एक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत़ मयत व्यक्तींमध्ये श्रवणकुमार मांगीलाल पारीख (३२) त्यांची दहा वर्षांची मुलगी अंबिका ऊर्फ विकी पारीख (१०) व भाऊ गोविंदकुमार पारीख (३०, सर्व राहणार साई कॉम्प्लेक्स, एफ - १ / १०३, दादरा नगर हवेली, सिल्वासा) यांचा समावेश आहे़ जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
मूळचे राजस्थान व सध्या नोकरीनिमित्त सिल्वासा येथील श्रवणकुमार पारीख (३२), त्यांची पत्नी मंजुदेवी पारीख (३०), मुली अंबिका ऊर्फ विकी (१०) व अहेना पारीख (८), भाऊ गोविंदकुमार पारीख (३०) व नातेवाईक रामदेव पारीख (२७) हे सिंहस्थ स्नानासाठी सॅन्टो कारने (डीएन ०९, डी-०४१४) नाशिकला आले होते़
रविवारी स्नान आटोपून पारीख कुटुंबीय पेठरोडमार्गे सिल्वासा येथे जात होते़ रासेगावजवळून जात असताना पुढील दुचाकीला (एमएच ४१, अे - ७३१०) वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या आयशरने (एमएच १५, सीएस ५२८५) सॅन्ट्रोला कट मारल्याने कार तीनदा उलटली़
या अपघातात कार चालविणारे श्रवणकुमार, त्यांची मुलगी अंबिका व भाऊ गोविंदकुमार यांचा मृत्यू झाला, तर पत्नी मंजुदेवी, दुसरी मुलगी अहेना व नातेवाईक रामदेव हे गंभीर जखमी झाले़, तर दुचाकीचालक रवींद्र (रा़ कामटवाडे, अंबड) हे किरकोळ जखमी झाले असून, या सर्वांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
या अपघाताची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, आयशरचालक अनिल कर्डिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
त्र्यंबक-जव्हार मार्ग बंद
सिल्वासा येथे जाण्यासाठी त्र्यंबकेश्वर जव्हार हा जवळचा मार्ग आहे; मात्र हा मार्ग बंद असल्याने पारीख कुटुंबीयांनी पेठमार्गाचा वापर केला. त्यांनी गिरणारे मार्गाचा वापर का केला नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्र्यंबकेश्वरजवळील मार्गावरील बॅरिकेडिंगचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्यांनी या मार्गाचा वापर केल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
कार्यकर्त्यांची धाव
अपघाताची घटना कळताच रासेगावचे योगेश थेटे बालाजी पवार, नाना थेटे, उमराळ्याचे माजी सरपंच संजय केदार, बालाजी ढगे, गणपत ढगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारच्या बाहेर काढले. त्याचवेळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, हवालदार बोरसे, कपिले, कातड हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी १0८ च्या अँम्ब्युलन्सला फोन केला. तसेच सेक्टर अथर्व या कंपनीच्या अँम्ब्युलन्समधून गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठविले.