सिंहस्थासाठी २,३७८ कोटी द्या
By Admin | Updated: June 10, 2014 00:34 IST2014-06-10T00:28:10+5:302014-06-10T00:34:26+5:30
दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भेट घेऊन केली.

सिंहस्थासाठी २,३७८ कोटी द्या
नाशिक : आगामी काळात नाशिकला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी नसल्याने कामे अपूर्णावस्थेत राहण्याची भीती निर्माण झाली असून, केंद्र शासनाने सिंहस्थासाठी २,३७८ कोटींचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भेट घेऊन केली.
ओझर येथे रविवारी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याने येथील उड्डाणपुलाचा प्रश्नही ऐरणीवर आला असून, तेथे तत्काळ उड्डाणपूल उभारण्यासाठी कार्यवाही सुरू करावी, अशीही मागणी त्यांनी केली. त्यावर गडकरी यांनी उड्डाणपुलाचे काम मार्गी लागण्यासाठी त्यांच्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलविली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना सिंहस्थाची कामे निधीवाचून रखडून पडली आहेत, तर काही कामांना निधी नसल्याने ती सुरू करण्यास संबंधित कंत्राटदारांनी नकार दिला आहे. नाशिकला जगभरातून भाविक येणार असल्याने सिंहस्थाची कामे तत्काळ पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी आवश्यक तो निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी केली. यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे गडकरी यांनी चव्हाणांना सांगितले. पिंपळगाव बसवंत येथील महामार्गावरील चिंचखेड फाट्यावर भुयारी मार्ग करण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली असून, तेथे भुयारी नव्हे तर उड्डाणपूलच उभारण्यात यावा, असेही खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सांगितले.(प्रतिनिधी)