शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्यास पाठिंबा देऊ !
By Admin | Updated: February 17, 2017 00:47 IST2017-02-17T00:47:31+5:302017-02-17T00:47:45+5:30
उद्धव ठाकरे यांचा अल्टिमेट्म : मोदी, फडणवीस यांच्यावर टीका

शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्यास पाठिंबा देऊ !
नाशिक : उत्तर प्रदेशातील निवडणुकीत सत्ता येत नाही हे पाहून तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आमिष दाखविणाऱ्या भाजपाने गेल्या अडीच वर्षांपासून फक्तथापाच मारल्या असून, त्यांना शेतकऱ्यांचा इतकाच कळवळा असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. तसेच त्यानंतरच्या काळात बिनव्याजी कर्ज दिल्यास शिवसेना भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा अल्टिमेट््म शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
नाशिक महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका केली. येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याने शेतातील कांदा जाळून टाकल्याचा संदर्भ देत ते म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून गारपीट, दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने चांगले दिन येण्याची आशा होती, परंतु पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी लादून दुष्काळात तेरावा महिना निर्माण केला. शेतकरी, सामान्य व्यक्ती त्यात भरडून निघाला, पन्नास दिवस, शंभर दिवस उलटूनही काहीच साध्य झाले नाही.
उलट शेतकऱ्यांना आयकर लागत नाही हे माहीत असूनही त्यांना बॅँकेत खाते उघडण्यास भाग पाडून त्यांच्याकडील नोटा बॅँकेत भरून घेतल्या नजीकच्या काळात याच शेतकऱ्यांना आयकराच्या कक्षेत आणण्याचा डाव खेळला जाणार असून, शेतकऱ्यांना आयकर लागणार नाही हे सरकारने जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता ठाकरे पुढे म्हणाले, देशात सध्या भय व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचे भाषणे होत होती, त्यात आचार, विचार असायचे, त्यांची वाणी, भाषा संयमी होती. परंतु दुर्दैवाने आता तशा प्रकारचे विचार देणारा नेताच देशात राहिलेला नाही, तर धमकी देणारा नेता दुर्दैवाने देशाला लाभला आहे, अशी टीका करून देशात भयावह वातावरण निर्माण करणाऱ्यांनी देशद्रोही, गुंडांवर आपला धाक निर्माण केला पाहिजे. परंतु एकेकाळी ज्या व्यासपीठावर साधू-महंत बसत होते त्या व्यासपीठावर गुंड-पुंड बसू लागल्याने देशात कसे परिवर्तन कसे होईल? असा सवालही त्यांनी विचारला.
भाजपाकडून गुंडांना पावन करण्याचा उद्योग सुरू झाला असून, असे गुंड आमच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न होणार असेल व ते जर गुंड आमच्या आया-भगिणींकडे वाकड्या नजरेने पाहणार असेल तर शिवसैनिक त्याचे हात काढून गुंडाच्या हातावर ठेवण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा देत ठाकरे यांनी, गेल्या २५ वर्षांपासून निव्वळ हिंदुत्व, राष्ट्रियत्व व भगवा झेंडा पाहून शिवसेना भाजपाच्या पाठीशी पहाडासारखी उभी राहिली. मोदी यांच्या प्रचारासाठी मीच जाहीरसभा घेतल्या, परंतु देशात व राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांना सेना नकोशी झाली. अडीच वर्षांपासून फक्त थापा मारून सत्ता भोगली जात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे कोणत्याही एका पक्षाचे नसतात, सर्वांना समान वागणूक देण्याची त्यांनी शपथ घेतलेली असते. परंतु सध्या हे दोघेही निवडणूक प्रचारासाठी बोंबलत फिरत असून, कारभाराच्या नावाने ठणाणा सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
नाशकात शिवसेनेची सत्ता असताना बरीच कामे झाली, परंतु गेल्या पाच वर्षांत काहीच झाले नाही. शिवसेनेने त्यावेळी दिलेली वचने पूर्ण केली, काय केले हे सांगण्यापेक्षा करून दाखवलं ही सेनेची कार्यपद्धती राहिली आहे. सेनेत नाकर्त्यांची अवलाद नाही, जे करता येईल तेच आश्वासन शिवसेना देते, असे सांगून ठाकरे यांनी साडेसात मीटर व नऊ मीटर रस्त्यावरील बांधकामांचा प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारित असला तरी, शिवसेनेची महापालिकेत सत्ता आल्यास हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करू तसेच झोपडपट्टीवासीयांना आहे तेथेच घरकूल देण्यात येईल. शहरात महापालिकेचे अद्ययावत रुग्णालयाची उभारणी, मोफत औषधोपचार, व्हर्चूअल शाळा, बससेवा सुरू करण्याची घोषणा केली.
यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, उपनेते बबन घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर आदिंची भाषणे झाली. प्रारंभी ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्व. बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीतील उमेदवार व्यासपीठावरच विराजमान करण्यात आले होते.