मुलीची छेड; पंचवटीत दगडफेक
By Admin | Updated: October 18, 2015 22:11 IST2015-10-18T22:11:25+5:302015-10-18T22:11:49+5:30
पोलिसासही मारहाण : गुन्हा दाखल

मुलीची छेड; पंचवटीत दगडफेक
नाशिक : दिंडोरी रोडवरील मायको हॉस्पिटल परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारण्याचा राग येऊन दोन गटांमध्ये झालेल्या वादातून दगडफेक करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्यासही मारहाण झाल्याची घटना घडली आहे़
मायको परिसरातील नवरात्रोत्सवात टिपऱ्यांच्या कार्यक्रमानंतर अल्पवयीन मुलीचा हात पकडणाऱ्या मुलास रामदास म्हसू गुंजाळ यांनी जाब विचारला असता त्याने शिवीगाळ व धक्काबुक्की करून दोघा जोडीदारांना लाल्या व गोट्या (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांना बोलवले. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या सुभद्राबाई गुंजाळ, राजू गुंजाळ यांनी संशयितांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी राहुलवाडीतील १० ते १५ साथीदारांना बोलावून शिवीगाळ करीत पोलीस कर्मचारी राजू गुंजाळ यांच्यासह इतरांना बेदम मारहाण केली़ तसेच परिसरात दगडफेकही केली़
या टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड केल्याची घटना पंचवटी पोेलिसांना कळविली असता त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र तोपर्यंत संशयित फरार झाले होते़ दरम्यान, या घटनेत जखमी झालेले पोलीस कर्मचारी गुंजाळ यांना खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अल्पवयीन संशयितासह लाल्या भालेराव, हेमंत भालेराव, चारू भालेराव यांच्यासह सुमारे पंधरा जणांविरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)