बंगळुरूचा गिरीशचंद्र ‘मॅरेथॉन चॅम्पियन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 00:25 IST2016-01-04T00:01:41+5:302016-01-04T00:25:39+5:30

४२ किलोमीटरची स्पर्धा : राष्ट्र बळकटीसाठी धावले ३५०० स्पर्धक; ज्येष्ठांमध्ये कोल्हापूरचे बाळासाहेब विजयी

Girish Chandra marathon champion of Bangalore | बंगळुरूचा गिरीशचंद्र ‘मॅरेथॉन चॅम्पियन’

बंगळुरूचा गिरीशचंद्र ‘मॅरेथॉन चॅम्पियन’

नाशिक : ‘आरोग्यासाठी धाव घ्या व देशाला बलवान करा’ या उदात्त हेतूने मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय व आठव्या राज्यस्तरीय ‘नाशिक मॅरेथॉन’ स्पर्धेत विविध गटांमध्ये सहभागी ३५०० स्पर्धकांनी धाव घेतली. यावेळी पुरुष गटात ४२.१९५ किलोमीटर इतके अंतर अवघ्या अडीच तासांत कापणारा बंगळुरूचा गिरीशचंद्र तिवारी हा ‘मविप्र मॅरेथॉन चॅम्पियन’ ठरला, तर उत्तराखंडचा कमल दर्शन सिंग याने दुसरा क्रमांक पटकाविला.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू नरसिंह यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगापूररोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकामधून सकाळी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, पोलीस आयुक्त एस.जगनाथन, क्रीडाअधिकारी संजय सबनीस, अ‍ॅड. नितीन ठाकरे, नाना दळवी, डॉ. सुनील ढिकले, भाऊसाहेब खताळे आदि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, जोरदार आतषबाजीसह ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांनी हवेत रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन केले.
समाजात आरोग्याविषयी जागृती व्हावी व खेळाडूंकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक व्हावा यासाठी गेल्या सोळा वर्षांपासून मविप्रकडून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. नववर्षाच्या पहिल्या रविवारी पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रसह, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली या राज्यांमध्यून विविध वयोगटांमध्ये स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. अर्थ मॅरेथॉन खुल्या पुरुष गटात व अर्ध मॅरेथॉन खुल्या महिला गटांमध्ये एकूण ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच वरिष्ठ-कनिष्ठ महाविद्यालय मुला-मुलींचा गट, माध्यमिक शालेय गट, प्राथमिक शालेय मुला-मुलींचा गट, महिला-पुरुष ज्येष्ठ नागरिक अशा एकूण सोळा गटांमध्ये तीन हजार पाचशे स्पर्धकांचा समावेश होता.
राष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धेचे सातत्यपूर्ण आयोजन करत ‘मविप्र’ने शतकमहोत्सवी वर्षात एक वेगळा आदर्श उपक्रम राबविला आहे. राष्ट्रीय विकासासाठी खेळाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात असून, स्पर्धेमध्ये भाग घेऊन आरोग्य उत्तम ठेवून देशाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी असल्याचे कुस्तीपटू नरसिंह यादव याने यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Girish Chandra marathon champion of Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.