जळगावी बछडा जेरबंद
By Admin | Updated: March 16, 2017 23:36 IST2017-03-16T23:31:10+5:302017-03-16T23:36:45+5:30
निफाड : तालुक्यातील जळगाव येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याचे एक वर्षाचे मादी बछडे जेरबंद झाले आहे.

जळगावी बछडा जेरबंद
निफाड : तालुक्यातील जळगाव येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याचे एक वर्षाचे मादी बछडे जेरबंद झाले आहे.
जळगाव येथे बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असल्याने वनविभागाने निफाड पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष कराड यांच्या जळगाव काथरगाव रोडवर असलेल्या शेतात काही दिवसांपूर्वी बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. गुरुवारी (दि. १६) पहाटेच्या सुमारास बछडा पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे सकाळी लक्षात आले. येवला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक दिलीप अहिरे, विजय लोंढे, संजय दाणे, भय्या शेख, पिंटू नेहरे, भारत माळी आदिंचे पथक गुरु वारी सकाळी तातडीने कराड यांच्या शेतात पोहोचले व पिंजऱ्यात जेरबंद बिबट्या ताब्यात घेतला.
मागील काही दिवसात जळगाव, सुंदरपूर परिसरात बिबट्याने मोटारसायकलस्वारांचा पाठलाग केला होता, तर ११ मार्च रोजी जुन्या सुंदरपूररोडवर शरद मोरे हे शेळ्या चारत असताना दुपारी ४ वाजता त्यांच्या डोळ्यादेखत बिबट्याने शेळीवर हल्ला करून तिला ठार केले होते. गुरुवारी एक वर्षाची मादी बछडे पिंजऱ्यात जेरबंद झाले. (वार्ताहर)वर्षभरातला १७ वा बिबट्या
निफाड तालुक्यात बिबट्यांचा वावर जरी वाढला तरी येवला वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी हे बिबट्यांना पकडण्यासाठी प्रामाणिकपणे सातत्याने प्रयत्नशील असतात. त्याच प्रयत्नाचे फलित म्हणून वनविभागाने या एका वर्षात तालुक्यात सुमारे १७ बिबटे पिंजऱ्यात पकडले आहेत.