चाैकशीच्या आत ठेकेदाराला पावणेदोन कोटी देण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:05+5:302021-02-05T05:42:05+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली (दि. २९) पार पडली. या वेळी वॉटरग्रेस प्रॉडक्टच्या ठेक्यावरून चर्चा ...

चाैकशीच्या आत ठेकेदाराला पावणेदोन कोटी देण्याचा घाट
महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली (दि. २९) पार पडली. या वेळी वॉटरग्रेस प्रॉडक्टच्या ठेक्यावरून चर्चा झाली. या कंपनीने सातशे कामगार पुरवले आहेत. मात्र, या कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन दिले जात नाही. हे वेतन ठेकेदार कापून घेत असल्याचा आरोप समितीत कमलेश बोडके, राहुल दिवे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी केला हेाता. त्यावरील अहवालदेखील सादर करण्यात आला होता. दरम्यान, हा अहवाल समितीसमोर सादर करण्यास आदेशित करण्यात आले होते. दरम्यान, या विषयावर शुक्रवारी (दि. २९) बोडके यांनी पुन्हा प्रश्न विचारला आणि ठेकेदाराला बिल अदा केले आहे काय, असा प्रश्न केल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी १ कोटी ७७ लाख रुपयांचे गेल्या महिन्याचे देयक मंजुरीसाठी पाठवल्याचे सांगितले. त्यामुळे नगरसेवक संतप्त झाले. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत देयक देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिलेले असतानादेखील प्रशासाने कार्यवाही का केली, असा प्रश्न करीत दोन्ही नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आणि सभापतींच्या खुर्चीसमोरच ठिय्या आंदोलन केले. प्रशासन आणि ठेकेदाराचे संगमनत असल्याचा आरोप केला. ही सभा तहकूब करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र सभापतींनी चौकशी संपेपर्यंत ठेकेदाराचे देयक देऊ नये, असे आदेश दिल्यानंतर त्यांनी आंदोलन थांबवले.
कोट...
स्थायी समितीने चौकशीचा ठराव केला असला तरी तो लिखित स्वरूपात प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. यासंदर्भात वरिष्ठांनी विचारणा केल्यानंतर त्यांना तसे कळवले होते. त्यानंतरच देयक पाठवण्यात आले हेाते.
- डॉ. कल्पना कुटे, संचालक, घनकचरा व्यवस्थापन
इन्फो..
सभेतून लाइव्ह ठेकेदाराला ऐकवणूक
स्थायी समितीत वॉटरग्रेसविषयी तक्रारी करण्यात येत असताना त्यासंदर्भात थेट सभागृहातून मोबाइल ऑन करून थेट ठेकेदाराला लाइव्ह ऐकवणूक केली जाते, असा आरोप या वेळी दिवे आणि बाेडके यांनी केला. अशा प्रकारचा आरोप प्रथमच झाल्याने अधिकारीही अवाक् झाले.