अक्षय्यतृतीयेनिमित्त घरोघरी कलशपूजन
By Admin | Updated: April 29, 2017 02:34 IST2017-04-29T02:33:59+5:302017-04-29T02:34:11+5:30
नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्यतृतीयेचा सण पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.

अक्षय्यतृतीयेनिमित्त घरोघरी कलशपूजन
नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्यतृतीयेचा सण पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त पूर्वजांच्या स्मृतीसाठी कलशपूजन करीत घास टाकण्याचा विधी पार पडला. तसेच पुरणपोळी आणि आमरसाचा नैवेद्य देवदेवताना दाखविण्यात आला.
अक्षय्यतृतीया म्हणजे आखाजीचा सण खान्देशात तसेच बागलाण पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. नाशिक शहरात सिडको-सातपूर परिसरात खान्देश व बागलाण भागातील मूळ रहिवासी असलेले अनेक नागरिक असल्याने त्यांनी घरोघरी पारंपरिक पद्धतीने सण साजरा केला. अन्य कुटुंबातही हा सण साजरा करण्यात आला. अक्षय्यतृतीया सणाला पौराणिक महत्त्व असून, या दिवशी केलेले पुण्य क्षय पावत नाही, म्हणजे अक्षय राहते असे मानले जाते. अक्षय्यतृतीयेचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी दिवाळीप्रमाणेच सासुरवाशिणी माहेरी येतात. त्यांना पाहुणचार म्हणून पुरणपोळी व आमरस करण्याची प्रथा आहे. खान्देशात गौराई बसवितात या गौराई विसर्जनाचा सण म्हणूनही आखाजीचे महत्त्व आहे. आजही खेड्यापाड्यात, शहरात या सणाला पुरणपोळी आणि आमरस करण्याची प्रथा कायम आहे.