मोटारीसह तीन दुचाकी हस्तगत
By Admin | Updated: March 16, 2016 23:29 IST2016-03-16T23:20:04+5:302016-03-16T23:29:34+5:30
मोटारीसह तीन दुचाकी हस्तगत

मोटारीसह तीन दुचाकी हस्तगत
नाशिक : चार दिवसांपूर्वी शहरातून चोरीला गेलेली मोटार व एका दुचाकीचा शोध घेत सरकारवाडा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या चारचाकी मोटारीसह तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
गेल्या शनिवारी (दि. ११) नीतेश मकवाना (४१, रा. तिडके कॉलनी) यांची कोतवाल पार्क तिडके कॉलनी येथील जिमच्या बाहेरून ह्युंदाई इआॅन मोटार (एमएच-१५ डीसी ८२३०) अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली होती. मोटारीत महागडा भ्रमणध्वनी व काही महत्त्वाची कागदपत्रेही होती. त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातून गौरव रवींद्र येवले (२५, महाजननगर, सिडको) यांची बजाज डिस्कव्हर दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. या वाहनांचा तपास करत असताना पोलिसांनी संशयित अक्षय कैलास सूर्यवंशी (२०, रा. पखालरोड), राजेश श्रीरंग चव्हाण (२३), भूषण प्रकाश आव्हाड (१९) दोघे रा. सातपूर यांना मोटार चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांची चौकशी केली असता त्यांनी मोटार चोरीची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून मोटार जप्त केल्या आहे. पोलिसांनी संशयित नाना रामदास सोनवणे (३७. रा काझीसांगवी, चांदवड), याला ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता त्याने तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. सांगितलेल्या ठिकाणावरुन साठ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहे. या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक सुरेश बोडखे, निरी शेगर आदिंचा तपास पथकात सहभाग होता. (प्रतिनिधी)