नायलॉन मांजात अडकलेल्या घारीची सुटका
By Admin | Updated: February 4, 2016 23:40 IST2016-02-04T23:39:02+5:302016-02-04T23:40:18+5:30
नायलॉन मांजात अडकलेल्या घारीची सुटका

नायलॉन मांजात अडकलेल्या घारीची सुटका
इंदिरानगर : येथील पिंगळे चौकातील वडाच्या वृक्षाला नायलॉन मांजात अडकलेल्या घारीची अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तास शर्थीचे प्रयत्न करून सुटका केली.
पक्षिमित्र उमेश नागरे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पिंगळे चौकातून जखमी कबुतर घेण्यासाठी जात असताना त्यांना एका वडाच्या झाडावर नायलॉन मांजाच्या जाळ्यात अडकलेली घार सुटका करून घेण्यासाठी फडफडताना दिसली. घारीला नायलॉन मांजात गुरफटलेल्या अवस्थेत पाहून त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती देत घारीची सुटका करण्यासाठी मदतीचे आवाहन केले. सदरचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत घारीला वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाने तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी शिडी लावून घारीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना घारीची सुटका करता आली नाही. अखेर रस्त्यावर शिडी लावून अग्निशमन दलाचे अनिल गांगुर्डे यांनी लाकडी आकडीच्या साह्याने घारीची सुटका केली खरी; मात्र घारीने आकाशात झेपावण्याचा प्रयत्न केला असता ती पुन्हा नायलॉन मांजाच्या जाळ्यात गुरफटली. त्यामुळे बचाव पथकाच्या जवानांना पुन्हा घारीची सुटका करावी लागली.अग्निशमन दलाचे सी. एम. भोळे, डी. व्ही. काकडे, आर. बी. जाधव, ए. एस. गांगुर्डे, बी. एम. खोडे, एम. बी. दातार आदि जवानांच्या तीन तासांच्या प्रयत्नांमुळे सुटका झालेल्या घारीने आकाशात भरारी घेतली. (वार्ताहर)