प्रशासकीय यंत्रणा सज्ज
By Admin | Updated: July 3, 2015 00:36 IST2015-07-03T00:36:24+5:302015-07-03T00:36:24+5:30
त्र्यंबकेश्वरमधील कामे पूर्णत्वाकडे

प्रशासकीय यंत्रणा सज्ज
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थासाठी करण्यात येत असलेल्या विकासकामांपैकी अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही कामांची नुकतीच पाहणी केली. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह दिवसाआड त्र्यंबकेश्वरला भेट देत आहेत. परिणामी जिल्हाधिकारी यांच्या धाकाने संबंधित लोक काळजीपूर्वक कामे करीत असल्याचे दृश्य सध्या पहावयास मिळत आहे. प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे त्र्यंबकला तळ ठोकून आहेत. शहरातील रस्ते, शेड, टॉयलेट आदिंची कामे येत्या २/४ दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यापैकी काही कामे पूर्णही झाली आहेत. नंतर मंजूर झालेली शेडची बांधकामेही लवकरच पूर्ण होतील. पाटबंधारे विभागामार्फत चालू असलेल्या घाटांच्या बांधकामावर शेवटचा हात फिरविणे सुरू आहे. थोड्या फार त्रुटी आहे त्या दूर केल्या जात आहेत. कारण मध्यंतरी पडलेल्या पावसाने प्रत्येकाला आपापल्या कामांतील उणिवा दाखविल्या गेल्या होत्या. यामध्ये गळके शेड, गळके टॉयलेट बांधकाम, रस्त्यात काही ठिकाणी साचलेले पाणी यापैकी काही ठिकाणी उणिवा दूर करण्यात आल्या तर काही ठिकाणी अद्याप कामे चालू आहेत. जुन्या आखाड्यातील अनेक उणिवा असून त्याबाबत पालकमंत्र्यांनी स्वत: लक्ष घातले आहे. दोनच दिवसांपूर्वी महामंत्री हरिगिरी महाराज यांनी शाहीस्नानात भाग न घेण्याची घोषणा केली होती. यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मेळा अधिकारी व मुख्याधिकारी यांच्यात चर्चा होऊन सामोपचाराने वाद मिटविण्यात आला. सा.बां.विभागाची कामेही पूर्ण झाली आहेत. त्र्यंबकेश्वर बसस्थानकाची कामे निकृष्टच झाली आहेत. येथील पहिलेच डांबरीकरणाचे काम निकृष्ट झाले असून, ठिकठिकाणी जमिनीपासून डांबर सुटले आहे. खड्डे पडले आहेत. येथील टॉयलेटची कामे झालीच नाही, आता जुने टॉयलेट तोडण्याचे काम सुरू आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते त्र्यंबकेश्वरला भेट देण्याची शक्यता लक्षात घेऊन घाईघाईने खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.