कायमस्वरूपी जागा मिळावी
By Admin | Updated: August 1, 2015 23:58 IST2015-08-01T23:58:26+5:302015-08-01T23:58:55+5:30
महंत धरमदास : शासनाकडे पाठपुरावा करणार

कायमस्वरूपी जागा मिळावी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकनगरीत लाखो साधू-महंत येतात; परंतु त्याशिवाय अन्य धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने वर्षभरात केव्हाही याठिकाणी साधू-महंत येत असल्याने अखिल भारतीय निर्वाणी आखाड्यासाठी कायमस्वरूपी जागा मिळावी, अशी मागणी आखाड्याचे महंत धरमदास यांनी केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अखिल भारतीय निर्वाणी आखाड्याचे महंत धरमदास महाराज साधुग्राममध्ये दाखल झाले असून, आखाड्याच्या ध्वजारोहणाच्या तयारीला लागले आहेत. यासंबंधी माहिती देताना महंत धरमदास म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीसाठी भारतभरातून लाखो-साधू-महंत येणार आहेत. सर्व आखाड्यांच्या साधू-महंतांची शाही मिरवणूक अखिल भारतीय निर्वाणी आखाड्यातून निघणार आहे. त्यासाठी निर्वाणी आखाड्यात विशाल मंडप तयार करण्यात येत आहे. सर्व आखाड्यांचे कामकाज सोयीसाठी वेगवेगळे असले तरी सर्व आखाड्यांचा उद्देश एकच आहे.
निर्वाणी आखाड्याचे भारतभर आश्रम आहेत. चित्रकुट, वृंदावन, हरिद्वार, नाशिक आदि ठिकाणी निर्वाणी आखाड्याचे आश्रम असून, येथेही आश्रम होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून आखाड्याला कायमस्वरूपी जागा मिळावी. कारण अन्य आखाड्यांचे नाशकात आश्रम आहेत. त्याप्रमाणे येथे आमचाही आश्रम असल्यास तीर्थयात्रेसाठी साधू-महंतांना निवासासाठी सोयीचे होईल, असेही महाराज म्हणाले. (प्रतिनिधी)