ओझरच्या राजकीय ग्लॅमरमुळे सामान्य जनता वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:15 IST2021-09-19T04:15:13+5:302021-09-19T04:15:13+5:30
ओझर नगर परिषद, पिंपळगाव बाजार समिती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी स्वतःला सिद्ध करून घेण्याच्या हालचाली गतिमान होऊ लागल्या ...

ओझरच्या राजकीय ग्लॅमरमुळे सामान्य जनता वेठीस
ओझर नगर परिषद, पिंपळगाव बाजार समिती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी स्वतःला सिद्ध करून घेण्याच्या हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. ओझर येथील कर्मचाऱ्यांचे पगार थकले, नागरी असुविधांमुळे आजारपण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. मेनकरसारख्या अनुभवी अधिकाऱ्याची बदली होणे ओझरकरांच्या दृष्टीने नुकसानदायी ठरले आहे. कार्यकर्त्यामध्ये ग्लॅमर निर्माण करण्याच्या नादात सामान्य जनता वेठीस धरली जात आहे. राष्ट्रवादी-शिवसेना-भाजप हे त्रिकुट तालुक्यात उदयास येऊ लागले आहे. आरोप, प्रत्यारोप हे निवडणुकीचे खाद्य सध्या तालुक्याच्या विकासात्मक पचनक्रियेला बाधा पोहोचवत असल्याने नेत्यांनी यातून बोध घ्यायला हवा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
इन्फो
नागरी सुविधांचा अभाव
सध्या ओझर नगर परिषद हाच विषय चर्चेत आहे. नगर परिषदेची कधीही निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रत्येक गट कामाला लागला आहे. मात्र, नागरिकांना नगर परिषदेतून विविध प्रकारचे दाखले, सुविधा मिळवताना द्राविडी प्राणायाम करावे लागत आहेत. डासांचे साम्राज्य वाढल्याने साथीच्या आजाराने ग्रासले आहे. मूलभूत सोयी-सुविधांविषयी ओरड कायम आहे. राजकीय नेत्यांनी या प्रश्नांकडे लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.