महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांची तडकाफडकी बदली
By Admin | Updated: April 28, 2016 23:47 IST2016-04-28T22:39:28+5:302016-04-28T23:47:26+5:30
आदिवासी विकास विभाग : नोकरभरती घोटाळा

महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांची तडकाफडकी बदली
नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या नोकरभरती प्रकरणी पहिला दणका महामंडळाचे महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांना बसला असून, त्यांची बदली नागपूरला करण्यात आली आहे. या नोकरभरती प्रकरणी त्यांच्यासह अन्य काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भरतीतील उमेदवार तसेच खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी थेट आरोप केले होते.
बुधवारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा नाशिकला आले होते. त्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाचे महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांची तडकाफडकी नागपूर विभागात बदली करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांवर आरोप आहेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची अथवा त्यांची अन्यत्र बदली करण्याची मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली होती. दुपारी पत्रकारांशी बोलताना आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी या नोकर भरतीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, हा केवळ संशय असून प्रत्यक्ष चौकशी अहवालानंतरच यात भ्रष्टाचार झाला किंवा नाही, हे निष्पन्न होणार असल्याचे सांगितले होते.
मात्र सायंकाळनंतर सूत्रे तातडीने हलली. या प्रकरणी ठपका असलेले महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांची गौंडवन विभागात (नागपूर) बदली करण्यात आली. त्यांच्यापाठोपाठ आता आणखी कोणाच्या बदल्या होणार याविषयी उत्सुकता आहे.