मनपा महासभेत गदारोळ

By Admin | Updated: September 12, 2015 22:39 IST2015-09-12T22:39:04+5:302015-09-12T22:39:48+5:30

गोंधळ : कॉँग्रेससह आघाडीचे २४ नगरसेवक निलंबित; राजदंड पळविला

In the General Assembly, | मनपा महासभेत गदारोळ

मनपा महासभेत गदारोळ

आझादनगर : येथील महापौरांकडून कॉँग्रेस नगरसेवकांच्या कामांना कात्री लावल्याच्या निषेधार्थ महासभेत गदारोळ झाला. कॉँग्रेस व आघाडीच्या दोन नगरसेवकांसह एकूण २४ नगरसेवकांना महापौर हाजी मोहंमद इब्राहीम यांनी निलंबित केले, तर राजदंड पळवून नेण्याचा प्रकार घडल्याने कॉँग्रेस नगरसेवकांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली.
शुक्रवारी दुपारी ४ वाजता महापौर मोहंमद इब्राहीम हाजी यांच्या अध्यक्षतेखाली महासभा घेण्यात आली. आयुक्त किशोर बोर्डे यांनी सभागृहास परिचय करून दिल्यानंतर अजेंड्यावरील विषय महासभा क्र. ३, दि.१८/३/१५ व विशेष महासभा क्र. ०४, दि.१५/०७/२०१५ चे इतिवृत्त कायम करण्यासाठी होता. परंतु तत्पूर्वी प्रभाग क्र. ३चे सभापती मो. एजाज मो. उमर यांनी मनपा नियम ४४ नुसार गिरणा धरणातील पाणी दुषित असल्याबाबत चर्चा करण्यासाठी विषय घेण्यात यावा, अशी मागणी केली; मात्र पाणीपुरवठा अभियंता जहीर अन्सारी हे जाणीवपूर्वक माझे विषय घेत नाही, असा त्यांनी आरोप केला. त्यातच कॉँग्रेस नगरसेवक रफीक शेख बशारत यांनी जहीर अन्सारी यांच्यावर व्यक्तिगत आरोप केल्याने शाब्दिक चकमक झाली. यावेळी महापौरांनी मध्यस्थी केली. एजाज उमर आपल्या उत्तरासाठी अडून राहिले. पाणीपुरवठा अभियंता जहीर अन्सारी म्हणाले, गिरणा धरणातील पाणी व शुद्धीकरण झालेले पाणी याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यावर आपणास माहिती देणार होतो. त्यावर एजाज उमर यांनी आपली स्वत:ची रक्तचाचणी केलेला अहवाल महापौरांकडे भिरकावला. मी एक प्रभाग सभापती, स्थायी समिती सदस्य व नगरसेवक असून, माझ्या पत्राची मनपा अधिकारी दखल घेत नाही, सामान्य जनतेस मी काय उत्तर देऊ असे म्हणत त्यांनी सभात्याग केला.
घोषणाबाजी : महाजचे नगरसेवक मो. आमीन मो. फारुक, मो. सुलतान, माजी उपमहापौर जमील जरवाला यांनी सभात्याग करीत महापौरांना घरचा अहेर दिला. दोन महासभेचे इतिवृत्त कायम करणे, हा विषय चर्चेत येताच कॉँग्रेस नगरसेवकांनी त्यास आक्षेप घेत सगा रद्द करण्याची मागणी केली. त्यातच दुसरी सूचना एजाज बेग यांनी
दिली.
यावर प्रथम आम्ही सूचना दिली असल्याने ती मान्य करण्यात यावी, अशी मागणी स्थायी सभापती ताहेरा शेख, अस्लम अन्सारी, शकील जानीबेग, विठ्ठल बर्वे, रफीक शेख बशारत यांच्यासह कॉँग्रेस नगरसेवकांनी करत महापौरांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यावर हात उंचावून मतदान घेण्यात आले.
यात कॉँग्रेसच्या बाजूने बहुमत असतानादेखील त्यांची मागणी अमान्य करण्यात आल्याने कॉँग्रेस नगरसेवकांचा संताप अनावर झाला. त्यांनी अधिकाऱ्यांच्या बाकावर जात महापौरांसमोरील ‘राजदंड’ पळवून नेला. परंतु माजी महापौर शेख मलीक यांनी तो हिसकावून घेत नगर सचिवांच्या ताब्यात दिला. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. महापौरांनी दहा मिनिटांसाठी महासभा तहकूब केली.
पुन्हा सभा सुरू होताच कॉँग्रेस नगरसेवकांनी घोषणांचे फलक हाती घेत, महापौरांविरोधात घोषणा देत सभागृहात प्रवेश केला. त्यावर महापौरांनी सुनील गायकवाड, मदन गायकवाडसह २२ नगरसेवकांना निलंबित करण्यात येत आहेत्, असा आदेश दिला. निलंबित का केले, असा प्रतिप्रश्न विचारत गोंधळ घालण्यात आला. गोंधळातच पुढील तीन विषयांवर चर्चा होत महासभा आटोपण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: In the General Assembly,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.