घासलेटधारकांच्या मुळाशी गॅस नोंदणी
By Admin | Updated: March 27, 2016 00:07 IST2016-03-27T00:07:30+5:302016-03-27T00:07:51+5:30
कोट्यात कपात : शिक्के मारणे सुरू

घासलेटधारकांच्या मुळाशी गॅस नोंदणी
नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकेवर दिले जाणारे घासलेट वितरण बंद करण्याच्या निर्णयाप्रत शासन पोहोचले असून, त्याची पहिली पायरी म्हणून प्रत्येक शिधापत्रिकेवर गॅस सिलिंडर असल्याचा शिक्का मारण्यास सुरुवात झाली आहे, तर ज्यांच्याकडे गॅस नाही, अशांना मासिक हप्त्याने गॅस पुरविण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात जिल्ह्यातील घासलेटच्या कोट्यात कपात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने ही मोहीम हाती घेतली असून, एक सिलिंडर व दोन सिलिंडर जोडणी असलेल्या ग्राहकांच्या शिधापत्रिकांवर शिक्के मारून गॅस ग्राहकांची संख्या निश्चित केली जात आहे. ही संख्या निश्चित झाल्यावर इंधन म्हणून घासलेटचा वापर करणाऱ्या घासलेट पात्र ग्राहकांची संख्याही आपोआपच स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात ज्यांच्याकडे गॅस नाही अशांना मासिक हप्त्याने गॅस सिलिंडरची जोडणी देण्याची योजना शासनाची आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे सहा लाख घासलेट पात्र व्यक्ती असून, ज्या व्यक्तीकडे गॅस जोडणी नाही अशा एका व्यक्तीस दोन लिटर, दोन व्यक्तीस तीन, तर तीन व्यक्तीस चार लिटर घासलेट दिले जात आहे, तर ज्यांच्याकडे एक सिलिंडर आहे अशांना दुसरे सिलिंडर घेण्यास प्रवृत्त करून शक्यतो घासलेटचा वापर कमी करण्यावर शासनाचा जोर आहे. जिल्ह्यात दोन लाख ८० हजार दोन सिलिंडरधारक असून, चार लाख ५६ हजार एक गॅस सिलिंडरधारक आहेत. त्यापैकी सुमारे चार लाख शिधापत्रिकांवर गॅस असल्या-नसल्याबद्दलचे शिक्के मारण्यात आले आहेत, उर्वरित शिधापत्रिकाधारकांवर शिक्के मारण्यात आल्यानंतर घासलेटचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या निश्चित होणार आहे.
जिल्ह्यात घासलेट वापरणाऱ्यांसाठी वीस लाख ८८ हजार लिटर दरमहा कोटा शासनाने निश्चित केला आहे. गेल्या जानेवारीतच हा कोटा तीन महिन्यांसाठी निश्चित करण्यात आला असून, येत्या एप्रिल महिन्यात गॅस नोंदणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर हा कोटा कमी होण्याची शक्यता शासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)