हॉटेलच्या किचनमध्ये गॅसचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST2021-09-26T04:16:07+5:302021-09-26T04:16:07+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नव्याने सुरू होत असलेल्या रेडिसन हॉटेलची विविध कामे सुरू असून, किचनमध्ये गॅसची पाईपलाईन टाकण्याचे तसेच त्याची ...

हॉटेलच्या किचनमध्ये गॅसचा स्फोट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नव्याने सुरू होत असलेल्या रेडिसन हॉटेलची विविध कामे सुरू असून, किचनमध्ये गॅसची पाईपलाईन टाकण्याचे तसेच त्याची चाचणी घेण्याचे काम रात्री सुरू होते.
शुक्रवारी (दि. २५) पसेन दिगंबर गवळी हे हॉटेलचे स्वयंपाकी रात्री आठ वाजता कामावरून घरी गेले. त्यानंतर सुमारे साडेनऊच्या सुमारास त्यांचे सहकारी गोमाग चित्रा यांनी फोन करून हॉटेलच्या किचनमध्ये स्फोट झाल्याचे सांगितले. गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम चालू असताना नायट्रोजन टेस्टिंग काम सुरू असताना हा स्फोट झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या स्फोटाचा जोरदार आवाज होऊन धावपळ उडाली. मात्र, या स्फोटात किचनमध्ये काम करणारे संतोष मोतीराम राठोड (३१), अक्षय पांडुरंग पोटाबट्टी (२०), दिवाकर प्रसाद (२६), अनिकेत वाल्मीक बोरसे (२३), सूरज चंद्रकांत पाटील (२०), नीळकंठ केशर राणा (४६), रंजन सहदेव शर्मा (२६), राजेश विश्वकर्मा (३१) हे कामगार जखमी झाले. या घटनेचे वृत्त कळताच इंदिरानगर पोलीस तसेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले व उपाययोजना करण्यात आली. जखमी झालेल्या कामगारांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
गेल्या आठवड्यात सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत अशाच प्रकारे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आठ ते दहा कर्मचारी जखमी झाले होते. त्यापाठोपाठ पुन्हा रेडिसन हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.