एक गॅस सिलिंडर धारकाचे घासलेट बंद
By Admin | Updated: September 15, 2015 23:06 IST2015-09-15T23:05:43+5:302015-09-15T23:06:09+5:30
प्रत्येकी फक्त चार लिटर : जिल्ह्णात शंभर टक्के कोटा

एक गॅस सिलिंडर धारकाचे घासलेट बंद
नाशिक : एक गॅस सिलिंडरधारकाला वर्षाकाठी बारा गॅस सिलिंडर मिळत असल्याने यापूर्वी एक गॅस सिलिंडरधारकाला देण्यात येणारे महिनाकाठचे दोन लिटर घासलेट बंद करण्याचा निर्णय राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला असून, घासलेटपात्र शिधापत्रिकाधारकांना यापुढे कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त चार लिटरच घासलेट देण्यात येणार आहे. शासनाने घासलेट वितरणाच्या धोरणात आता बदल केल्याने जिल्ह्णाच्या मागणीनुसार शंभर टक्के कोटा सप्टेंबर महिन्यात प्राप्त झाला आहे.
विना गॅसधारक व एक गॅस धारकांच्या इंधनाबाबत वेळोवेळी न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने गेल्या काही महिन्यांपासून या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून धोरण आखण्याची कार्यवाही सुरू होती, त्यातच नागपूर खंडपीठाने गरीब जनतेची घासलेटची गरज जास्त असते व गरीब जनता मुख्यत्वे करून ग्रामीण भागातच असल्याने शासनाने ग्रामीण व शहरी भागाकरिता घासलेटचे समान परिमाण ठरविण्याबाबत पुनर्विचार करावा, असे आदेश दिले होते त्यानुसार १ सप्टेंबरपासून नवीन घासलेट धोरण अंमलात आणण्यात आले आहे. त्याचा पहिला फटका एक गॅस सिलिंडर धारकाला बसला असून, यापूर्वी त्यांना देण्यात येणारे महिना दोन लिटर घासलेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एक गॅस सिलिंडरधारकाने संबंधित गॅस एजन्सीकडून दुसरे गॅस सिलिंडरची जोडणी घेणे क्रमप्राप्त झाले असून, एक गॅस सिलिंडर असो वा दोन प्रत्येक गॅस ग्राहकाला वर्षातून बारा अनुदानित गॅस सिलिंडर मिळत असल्याने त्यासाठी घासलेट देण्याची गरज नसल्याचे सरकारचे मत आहे.
नवीन धोरणानुसार आता बिगर गॅसधारकांना म्हणजेच घासलेटपात्र एका व्यक्तीला महिनाकाठी दोन लिटर, दोन व्यक्तींसाठी तीन लिटर व तीन व्यक्ती अथवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींसाठी महिन्याला फक्त चार लिटर घासलेट दिले जाणार आहे.