उद्याने ओस, साहित्य खरेदीचा भारी सोस
By Admin | Updated: September 23, 2015 23:43 IST2015-09-23T23:33:50+5:302015-09-23T23:43:41+5:30
देखभालीअभावी दुरवस्था : बेंचेस खरेदीसाठी निविदाप्रक्रिया

उद्याने ओस, साहित्य खरेदीचा भारी सोस
नाशिक : शहरातील बहुसंख्य उद्यानांची देखभालीअभावी विदारक स्थिती असताना त्याकडे लक्ष पुरविण्याऐवजी महापालिकेला मात्र खेळणी आणि बेंचेस खरेदीचा सोस असल्याचे दिसून येत आहे. आधी उद्याने जगवा मग उद्यानांमध्ये साहित्य बसवा, असा पवित्रा सदस्यांसह नागरिकांकडून घेतला जाऊ लागला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील विविध उद्याने तसेच खुल्या जागा व मोकळ्या परिसरात बेंचेस बसविण्यासाठी सुमारे ४१ लाख रुपये खर्चाच्या निविदा काढल्याने विभागाच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.
शहरात महापालिकेची सुमारे ४७० हून अधिक उद्याने आहेत. सुमारे १५० उद्यानांची देखभाल ही महापालिकेच्या २२० कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. गेडाम यांनी २८६ उद्यानांची देखभाल खासगीकरणाच्या माध्ममातून करण्याचा प्रस्ताव महासभेवर मांडला होता. त्यासाठी ३ वर्षांचा ठेका देण्याचे प्रस्तावित करताना संबंधित मक्तेदारासाठी ६३ कलमी कठोर नियमावलीही आयुक्तांनी तयार केली होती. सदर उद्यानांची एकत्रित निविदा काढून कार्यपद्धतीत सुसूत्रता आणण्याचा आयुक्तांचा प्रयत्न होता. परंतु महासभेने आयुक्तांचा प्रस्ताव फेटाळून लावत महिला बचत गटांना उद्यान देखभालीचे काम देण्याचा ठराव केला होता शिवाय संबंधित महिलांना मुक्त विद्यापीठामार्फत उद्यान विद्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्याचाही निर्णय झाला होता. सदरचा ठराव होऊन सहा महिने लोटले तरी प्रशासनाकडून अद्याप महिला बचत गटांकडे उद्याने सोपविण्याची कार्यवाही झालेली नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याचे कारण सांगत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या प्रश्नाबाबत टोलवाटोलवीच केल्याचा आरोप सदस्यांनी केला.
याशिवाय उद्यानांबाबत महासभा, स्थायी समिती तसेच प्रभाग समित्यांच्या सभांमध्येही सदस्यांनी वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नाही. अनेक उद्यानांची स्थिती देखभालीअभावी अतिशय गंभीर बनली असून बऱ्याचशा उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याने नागरिकांना त्याठिकाणी लहान मुलांना पाठविणे धोक्याचे बनले आहे. काही उद्यानांचा ताबा तर जुगारी, मद्यपींना घेतलेला दिसून येतो. उद्याने अशी ओस पडलेली असताना त्याठिकाणी देखभाल-दुरुस्तीची कामे करण्याऐवजी महापालिकेचा उद्यान विभाग बेंचेस व खेळणी बसविण्याचा घाट घालत आहे. ज्या उद्यानांमध्ये नागरिकांना बसणे तर दूरच प्रवेश करणेही अवघड होऊन बसले आहे. तेथे बेंचेस टाकण्याचा हा उपद्व्याप कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जी उद्याने बऱ्यापैकी विकसित झालेली आहेत आणि देखभालीच्या दृष्टीने सुस्थितीत आहेत तेथे खेळणी व बेंचेस बसविण्यास हरकत नाही परंतु जी उद्याने ओस पडली आहेत तेथेही साहित्य बसविण्यासाठी खरेदीचा सोस सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)