वेतनासाठी घंटागाडी कामगार आज महापालिकेच्या दारात
By Admin | Updated: October 14, 2015 23:19 IST2015-10-14T23:16:37+5:302015-10-14T23:19:55+5:30
वेतनासाठी घंटागाडी कामगार आज महापालिकेच्या दारात

वेतनासाठी घंटागाडी कामगार आज महापालिकेच्या दारात
नाशिक : घंटागाडी कामगारांना महाराष्ट्र शासनाने एका अधिसूचनेनुसार वाढीव किमान वेतन फरकासह अदा करण्याचे आणि मनपाच्या आरोग्य विभागानेही संबंधित ठेकेदारांना त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊनही ठेकेदारांनी कामगारांच्या बॅँक खात्यात रक्कम जमा न केल्याने गुरुवारी (दि. १५) सर्व घंटागाडी कामगार वेतन घेण्यासाठी महापालिकेच्या दारात तळ ठोकून बसणार आहेत.
नाशिक मनपा श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी याबाबतचे इशारा पत्रही मनपा आयुक्तांना दिले आहे. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, घंटागाडी कामगारांना किमान मूळ वेतन आणि त्यावरील विशेष भत्ता मागील फरकासह अदा करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे, शहरातील घंटागाडी कामगारांना दि. २४ फेब्रुवारी २०१५ पासून वाढीव किमान वेतन फरकासह ठेकेदारांनी अदा करायचे आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यानुसार घंटागाडी ठेकेदार मे. वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्स, मे. विशाल सर्व्हिसेस, मे. समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनी, ठाणे आणि सय्यद असिफ अली यांना पत्र देऊन त्याची अंमलबजावणी १० आॅक्टोबर २०१५ पूर्वी करण्याचे आदेशित केले आहे. परंतु, श्रमिक संघाने दिलेल्या पत्रानुसार, घंटागाडी कामगारांच्या बॅँक खात्यात दि. १३ आॅक्टोबरपर्यंत वाढीव किमान वेतन फरकासह जमा झालेले नव्हते. त्यामुळे श्रमिक संघाने गुरुवारी मनपाच्याच दारात जाऊन तळ ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.