मलनिस्सारण केंद्र बनले कचरा डेपो
By Admin | Updated: November 23, 2015 23:15 IST2015-11-23T23:13:54+5:302015-11-23T23:15:00+5:30
उंटवाडी : दुर्गंधीने साथीच्या आजारांची भीती; भटक्या गायी, कुत्र्यांचा त्रास

मलनिस्सारण केंद्र बनले कचरा डेपो
सिडको : उंटवाडी परिसरातील मलनिस्सारण केंद्र हटविल्यानंतर त्याची दुरवस्था झाली असून, कचरा टाकला जात असल्याने परिसराला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून विविध साथींच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
उंटवाडी परिसरातील मलनिस्सारण केंद्र हटविल्यानंतर केंद्राची भिंत पडली आहे. परिसरातून जाणारे - येणारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा टाकत असल्याने, तसेच या जागेचा प्रातर्विधीसाठी वापर केला जात असल्याने परिसरात दुर्गंधी येत आहे. गत दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. कचऱ्यावर परिसरातील भटकी जनावरे, कुत्रे यथेच्छ ताव मारत असून, दुर्गंधी येऊन परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ टाकले जात असल्याने भटक्या कुत्र्यांची व गायींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरी संबंधित विभागाने याची दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली. केंद्रालगत कालिका गार्डन असून, तेथे सायंकाळच्या वेळी परिसरातील लहान मुले, तसेच नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र येथे येत असलेल्या दुर्गंधीमुळे त्यांना त्रास होतो. तरी संबंधित विभागाने दखल घ्यावी.
दोन महिन्यांपूर्वी येथे भररस्त्यात १५ ते २० फुटाचा मोठा खड्डा पडला होता. तो बुजविल्यानंतर लगेच एक महिन्यानंतर पुन्हा खड्डा पडला. त्यानंतर मनपाच्या संबंधित विभागाने तो खड्डा बुजवून तेथे पोलीस बॅरिकेड लावून ठेवले आहे. सदर रस्त्याच्या दुरुस्तीची करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)