ग्रामपंचायतींच्या घरपट्टी कर आकारणीस स्थगिती
By Admin | Updated: April 9, 2015 00:09 IST2015-04-09T00:05:57+5:302015-04-09T00:09:05+5:30
शासनाच्या आदेशाचे परिपत्रक

ग्रामपंचायतींच्या घरपट्टी कर आकारणीस स्थगिती
नाशिक : उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या इमारतींवरील कर आकारणी (घरपट्टी कर ) पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
५ एप्रिलला ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार ही स्थगिती देण्यात आली आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयात १० नोव्हेंबर २०१४ रोजीच्या आदेशास अनुसरून ग्रामपंचायतींच्या मालमत्ता व कर आकारणीत समानता व सुसूत्रता ठेवण्याकरिता शासनास शिफारशी करण्याकरिता शासन निर्णय ९ जानेवारी २०१५ अन्वये एक अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. या अभ्यासगटाचा अहवाल शासनास प्राप्त होऊन ग्रामपंचायतींच्या हद्दीतील बांधकामांवर कशाप्रकारे कर आकारणी करण्यात यावी, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये ३ डिसेंबर १९९९ च्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियमातील नियम २ ते ४ मध्ये करण्यात आलेली सुधारणा रद्दबातल केली असल्याने या सुधारणेनुसार करण्यात येत असलेल्या कर वसुलीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. तसेच कर वसुलीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या परिपत्रकाद्वारे कळविले आहे. (प्रतिनिधी)
आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी बस्ते
कळवण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सुनील उखाजी बस्ते यांची निवड करण्यात आली. डॉ आंबेडकर जयंती उत्सव समितीत विलास बस्ते, संजय बस्ते, नितीन बस्ते, अमोल बस्ते, बंटी बस्ते, सागर बस्ते, बाळू जगताप, पप्पू बस्ते, चेतन गोयर, विनोद गोयर, मुकेश बस्ते, सचिन बस्ते, संदीप केदारे, समाधान केदारे, दिनेश बस्ते, स्वप्नील धिवरे, कुंदन बस्ते आदींचा समावेश आहे.(वार्ताहर)