नाशिकहून गणपती बाप्पा निघाले लंडनला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST2021-08-15T04:16:50+5:302021-08-15T04:16:50+5:30
गणरायाचे आगमन उत्साह आणि आनंद निर्माण करीत असते. आबालवृद्ध यात सहभागी होत असल्याने उत्सवात अवघे कुटुंबच सहभागी होत असते. ...

नाशिकहून गणपती बाप्पा निघाले लंडनला!
गणरायाचे आगमन उत्साह आणि आनंद निर्माण करीत असते. आबालवृद्ध यात सहभागी होत असल्याने उत्सवात अवघे कुटुंबच सहभागी होत असते. दरवर्षीचा उत्साह गेल्या वर्षी मात्र कमी झाला. यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने उत्साह वाढला आहे. त्यातच आरोग्य नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मूर्तिकार आणि तत्सम घटकदेखील आनंदले आहेत.
नाशिकच्या सिडको भागात गणेशमूर्ती तयार करणाऱ्या शांताराम मोरे आणि त्यांच्या मुलांची ही तिसरी पिढी. कायम पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्ती आणि नैसर्गिक रंग हे त्यांचे खास वैशिष्ट्य ! नाशिक आणि राज्यातच नव्हे तर विदेशात गेल्या सोळा वर्षांपासून त्यांच्या गणेशमूर्ती विकल्या जात आहेत. यंदा विदेशात विशेषत: लंडनला नेहमीपेक्षा मागणी वाढल्याचे शिल्पकार मयूर मोरे यांनी सांगितले.
मोरे कुटुंबातील शांताराम मोरे, मयूर, हर्षद आणि ओंकार मोरे हे सध्या मूर्ती तयार करतात.
२०१९ मध्ये मोरे कुटुंबीयांनी साडेबाराशे मूर्ती तयार केल्या होत्या. त्यात साडेतीनशे गणपती विदेशात म्हणजेच प्रामुख्याने लंडनला पाठवले होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन तसेच निर्यात हाेऊ शकली नाही. यंदा मात्र, सातशे मूर्तींची मागणी लंडनमधून नोंदवण्यात आली आहे. काही मोजकेच गणपती कतारमध्ये पाठवले जाणार आहेत. लंडनमध्ये मूर्तींची मागणी दुपटीने वाढण्याचे कारण म्हणजे यंदा तेथे कोरोनामुळे व्यक्तिगत पातळीवर म्हणजे सार्वजनिक उत्सवापेक्षा घरीच गणरायाची प्रतिष्ठापना होणार असल्याचे तेथील मागणी करणाऱ्यांच्या नोंदणीतून कळले असल्याचे मयूर मोरे यांनी सांगितले. त्यामुळे यंदा लंडनमध्येही उत्सव जोरात साजरा होणार असल्याचे दिसत आहे.
कोट..
स्थानिक पातळीवरच इंधन खर्चामुळे वाहतूक खर्च तसेच रंग आणि अन्य साहित्य महाग झाले आहे. मात्र, त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे विदेशात निर्यातीचा खर्च वाढला असून, दीड ते पावणेदोन पट खर्च वाढल्याने बाप्पालाही महागाईच्या झळा पोहोचल्या आहेत. अर्थात, विदेशात मूर्ती पाठवण्याचा खर्च वाढूनही मागणी मात्र वाढली आहे.
- मयूर मोरे, नाशिक
----
छायाचित्र क्रमांक ९१