नाशिक : ‘नाच रे मोरा नाच’, ‘हसरा नाचरा सुंदर साजिरा श्रावण आला’ या गाण्यांच्या तालावर कथक नृत्यशैलीतील पैंजणांच्या झंकाराने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, ‘नृत्यांगण’ संगीत संस्थेतर्फे आयोजित संगीत संस्थेच्या आवर्तन संगीत समारोहाचे. यावेळी नृत्यांगणच्या लहान-मोठ्या अदाकारांनी विविध नृत्याविष्कार सादर करून रसिकांना भुरळ घातली. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी (दि.३०) आवर्तन संगीत सोहळ्याचे रंगभूषाकार माणिक कानडे व ध्वनी संयोजक पराग जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नृत्यांगणच्या नृत्यशिक्षिका सायली मोहाडकर तसेच कीर्ती भवाळकर उपस्थित होत्या. प्रारंभी गे गजवगना... या गणपती अराधनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी नृत्यांगणच्या शिष्यांनी राग मल्हार सादर करून रसिकांची दाद मिळवली. चिमुकल्या कलाकारांच्या अदाकारीनेही कथकप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. धनेश जोशी यांच्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत भरली. हा संगीत महोत्सव दोन दिवस सुरू राहणार असून, मंगळवारी (दि.३१) या संगीत महोत्सवात नादब्रह्म थीमवर विविध नृत्याविष्कार सादर केले जाणार आहे.विविध नृत्यांगनांनी सादर केलेल्या ‘घन घन माला’, चिंब भिजलेले, मेघा रे मेघा या नृत्याविष्कारातून राग मल्हारचे विविध रंग आणि रूपं रसिकांसमोर उलगडले. यावेळी सायलीसह तिच्या पारंगत शिष्यांनी ‘बुंदन’, घन बरसत आले, घन घन बरसत मेघ सावळा आणि आयरिश मल्हार या संगीत रचनांवर सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी व मधुरा बेळे यांच्या शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
आवर्तन संगीत सोहळ्यात गुंजला पैंजणांचा झंकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:03 IST