गंगापूर धरणाची सुरक्षितता ऐरणीवर
By Admin | Updated: August 12, 2016 23:00 IST2016-08-12T23:00:02+5:302016-08-12T23:00:17+5:30
पाटबंधारे विभागाचे पत्र : कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताची मागणी

गंगापूर धरणाची सुरक्षितता ऐरणीवर
नाशिक : गेल्या वर्षी जायकवाडीला पाणी सोडल्याने निर्माण झालेला तंटा, मराठवाड्यातील नेत्यांकडून होणारी चिथावणीखोर भाषा याचबरोबर धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांबरोबर सातत्याने कर्मचाऱ्यांशी होणारे वादविवाद या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणाची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. महापौरांसह निवासी उपजिल्हाधिकारी पाठोपाठ पाटबंधारे विभागानेही धरणाच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली असून ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे गंगापूर आणि कश्यपी धरणावर कायमस्वरूपी आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण सुमारे ८७ टक्के भरले आहे. शहरापासून १६ कि.मी.अंतरावर असलेल्या या धरणातून नाशिक शहराला पिण्यासाठी तसेच एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासह सातपूर औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्याने मोठा तंटा उभा राहिला होता. त्यातच मराठवाड्यातील एका नेत्याने धरण बॉम्बने उडवून देण्याची चिथावणीखोर भाषा केली होती. आता धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने येत्या तीन-चार महिन्यांत पुन्हा एकदा पाण्यावरून तंटा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवरच महापौर अशोक मुर्तडक यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाकडे धरणावर पोलीस बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली होती. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनीही पाटबंधारे विभागाला पत्र पाठवून त्याबाबत दखल घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार, पाटबंधारे विभागाने ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून गंगापूर धरणावर चार आणि कश्यपी धरणावर चार याप्रमाणे आठ पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी पुरविण्याची मागणी केली आहे. पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी पत्रात म्हटले आहे, शहरापासून धरण जवळ असल्याने धरण पाहण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढते आहे. गंगापूर धरण शाखेत सध्या आठ मजूर / चौकीदार कार्यरत असून दिवसपाळीसाठी धरण माथ्यावर दोन कर्मचारी, एक विश्रामगृहावर, तर एक धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असतो. त्याचप्रमाणे रात्रपाळीसाठी ४ कर्मचाऱ्यांमार्फत धरणाची सुरक्षितता पाहिली जात आहे.
गंगापूर धरणाची लांबी ३.८ कि.मी. असून एवढ्या लांबीच्या धरण माथ्याचे संरक्षण करणे अवघड असल्याने गंगापूर धरणाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता आहे. त्यासाठी दिवसपाळीसाठी दोन व रात्रपाळीपाळीसाठी दोन याप्रमाणे चार पोलिसांची गरज आहे. त्याचबरोबर कश्यपी धरणावरही प्रकल्पग्रस्तांकडून नेहमी आंदोलने होत असतात. बऱ्याचदा कश्यपी धरणावर प्रकल्पग्रस्त येऊन सेवाद्वार उघडून घेतात व परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे कश्यपी धरणासाठीही दिवसपाळीत दोन, तर रात्रपाळीसाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने सदर पोलीस बंदोबस्त तातडीने पुरविण्याची मागणीही पाटबंधारे विभागाने केली आहे. (प्रतिनिधी)