गंगापूर धरण 47 टक्के
By Admin | Updated: July 12, 2016 00:52 IST2016-07-12T00:28:36+5:302016-07-12T00:52:20+5:30
आठ टक्क्यांनी वाढ : सोमवारी पहाटेपर्यंत धरण क्षेत्रात २८७ मि.मी. पाऊस

गंगापूर धरण 47 टक्के
नाशिक : गंगापूर धरणाचा जलसाठा रविवारी रात्रीतून आठ टक्क्यांनी वाढला असून, सोमवारी (दि.११) पहाटेपर्यंत धरण ४७.२२ टक्के भरले. धरणात दोन हजार ६५९ दलघफू (अडीच टीएमसी) इतका जलसाठा आहे.
शनिवारी पहाटे सहा वाजेपासून तर रविवारी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरण अवघे २३ टक्के भरले होते; मात्र रविवारी संध्याकाळपर्यंत धरणाच्या पाण्याची पातळी ३८ टक्क्यांवर पोहचली. रविवारी रात्री धरण क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरण सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ४७.२२ टक्के भरले होते. धरण क्षेत्रात दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच राहिल्याने काही प्रमाणात संध्याकाळपर्यंत धरणाची पाण्याची पातळी पुढे सरकल्याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तविला आहे. एकूणच धरणाचा जलसाठा वाढत असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.
मागील सहा महिन्यांपासून पाणीकपातीचा सामना करणाऱ्या नाशिककरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, महापौरांनी पाणीकपात रद्द करण्याची घोषणा सोमवारी केली. यामुळे नाशिककरांवर खऱ्या अर्थाने वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसाने गोदावरी दुथडी भरून वाहिली. तसेच गंगापूरचा खालावलेला जलसाठाही वाढत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)