दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; चौघे अटकेत
By Admin | Updated: February 14, 2017 02:08 IST2017-02-14T02:07:50+5:302017-02-14T02:08:03+5:30
दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; चौघे अटकेत

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; चौघे अटकेत
पंचवटी : मखमलाबाद परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फॉरेस्ट नर्सरीसमोर अंधारात लपून बसलेल्या चौघा संशयित दरोडेखोरांच्या टोळीला म्हसरूळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी या टोळीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, धारदार शस्त्रास्त्रे, नायलॉन दोरी व अन्य दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त केले आहे.याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन चौघांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे गस्त पथक रात्री पावणे आठ वाजता मखमलाबाद परिसरातील फॉरेस्ट नर्सरीजवळ गस्त घालत असताना अंधारात पेठरोड मेहेरधाम येथील प्रशांत अशोक जाधव, संकेत भाऊराव शिंदे, फुलेनगर येथील कुमार लक्ष्मण कवटे, नीलेश सुभाष वानखेडे असे चौघे जण संशयास्पद लपून बसलेले दिसले. पोलिसांनी बॅटरी चमकविताच ते पळून जाऊ लागल्याने पोलिसांना त्यांचा संशय बळावला. त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार शस्त्रास्त्रे, देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस, मिरची पूड, नायलॉन दोरी असे साहित्य आढळून आले. अधिक चौकशी केली असता त्यांनी परिसरात दरोडा टाकण्याच्या हेतूने फिरत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. म्हसरूळ पोलिसा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. (वार्ताहर)