दरोड्याच्या तयारीमधील टोळी जेरबंद
By Admin | Updated: August 1, 2016 00:42 IST2016-08-01T00:42:04+5:302016-08-01T00:42:54+5:30
म्हसरूळ : पाच संशयितांकडून शस्त्र, रोकड जप्त

दरोड्याच्या तयारीमधील टोळी जेरबंद
पंचवटी : दिंडोरीरोडवरील म्हसरूळ (बोरगड) आश्रम शाळेजवळ दरोडा टाकण्यासाठी दबा धरून बसलेल्या पाच संशियत दरोडेखोरांना म्हसरूळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. संशियतांकडून पोलिसांनी धारदार कोयते, दोरी, इस्टीम कार, मिरची पूड आणि ३७ हजारांची रोकड असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संशयित शरद दीपक पगारे, आरिफ सलिम कुरेशी, सागर आनंदा चंद्रमोरे (सर्व रा. म्हसरूळ) तसेच यशवंत मधुकर जाधव (रा.जलालपूर) व अरुण वाळू चौधरी (रा.तळेगाव दिंडोरी) यांना अटक केली आहे. रविवारी (दि.३१) पहाटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी बोरगड परिसरातील ए. टी. पवार आश्रम शाळेजवळ गस्तीवर होते.
यावेळी (एमएच १५ बीडी १६११) ही ईस्टीम कार संशयास्पद असल्याचे पथकाला आढळून आले. पोलिसांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने कार न थांबविता वेगाने पुढे दामटविली. त्यामुळे पथकाचा संशय अधिकच बळावला व पाठलाग करून आरोपींना पकडले. पगारे व कुरेशी हे सराईत गुन्हेगार असून, काही महिन्यांपूर्वी झालेल्या रोशन निकम हत्त्या प्रकरणात दोघांचा सहभाग होता. या सर्वांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)