गणेशमंडळांच्या मंडपांचे आकार छोटे
By Admin | Updated: September 4, 2015 23:40 IST2015-09-04T23:39:42+5:302015-09-04T23:40:42+5:30
सहकार्याची भूमिका : रस्त्यांवर मंडप न थाटण्याचा निर्णय

गणेशमंडळांच्या मंडपांचे आकार छोटे
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील दि. १३ आणि १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शाही पर्वणीकाळाच्या दरम्यानच गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असल्याने पर्वणीला होणारी गर्दी लक्षात घेता गणेश मंडळांना यंदा रस्त्यांवर मंडप न थाटण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केल्यानंतर मंडळांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मंडळांनी सहकार्याची भूमिका घेत मंडपांचे आकारही कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिकला होणाऱ्या अखेरच्या शाही पर्वणीच्या पूर्वसंध्येलाच दि. १७ सप्टेंबरला गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. शाही पर्वणीकाळात पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजन केलेले आहे. पर्वणीला भाविकांचीही संख्या वाढण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला जात आहे. अशावेळी शहरातील रस्ते मोकळे असावेत, त्यावर कोणतेही अडथळे येऊ नयेत याकरिता यंदा गणेशमंडळांना रस्त्यांवर मंडप न टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक मंडळांना त्यांच्या मंडपांचे आकारमानही कमी करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील नामांकित व बड्या मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रामुख्याने रविवार कारंजा मित्रमंडळाचा देखावा गणेशभक्तांचे मोठे आकर्षण असते. मंडळाचा भव्य मंडप, भव्य देखावा, विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत असते. दरवर्षी मंडळाकडून ४० बाय ४० चा मंडप उभारला जातो. यंदा मात्र त्याचा आकार २५ बाय २५ वर आणण्यात आला आहे. त्यामुळे मंडपाचा अडथळा भाविकांना व वाहतुकीला होणार नाही. याशिवाय देखावाही छोट्या स्वरूपात असणार आहे. रविवार कारंजाबरोबरच मेनरोडवरील माजी महापौर विनायक पांडे यांच्या शिवसेवा युवक मंडळाचाही मंडप दरवर्षी गाडगे महाराज चौकात रस्त्यातच थाटला जात असतो. यंदा मात्र मंडळाने पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेत गणेशाची स्थापना विजयानंद-दामोदर थिएटरच्या प्रांगणात करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अन्य बव्हंशी मंडळांनीही रस्त्यांवर मंडप न उभारण्याचे ठरविले असून, काही ठिकाणी मंडपांचे आकार कमी करण्याचा निर्णय घेतला
आहे. (प्रतिनिधी)