नांदूरशिंगोटे परिसरातील बाजारपेठेतही गणेशमूर्ती दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST2021-09-09T04:18:44+5:302021-09-09T04:18:44+5:30

नांदूरशिंगोटे : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी ग्रामीण भागातील बाजारपेठा विविध आकर्षक गणेशमूर्तींनी सजल्या असून, गणेशमूर्ती खरेदीसाठी भक्तांची लगबग ...

Ganesh idols were also introduced in the market in Nandurshingote area | नांदूरशिंगोटे परिसरातील बाजारपेठेतही गणेशमूर्ती दाखल

नांदूरशिंगोटे परिसरातील बाजारपेठेतही गणेशमूर्ती दाखल

नांदूरशिंगोटे : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी ग्रामीण भागातील बाजारपेठा विविध आकर्षक गणेशमूर्तींनी सजल्या असून, गणेशमूर्ती खरेदीसाठी भक्तांची लगबग सुरू आहे. नांदूरशिंगोटे येथे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने नेहमीच सण-उत्सवांच्या काळात येथे विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी ग्राहकांची गर्दी होत असते. ग्रामीण भागात गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहेच. त्यामुळे गणेशभक्तांच्या आनंदावर काहीसे विरजण पडले आहे. पण तरीही शासनाने घालून दिलेले नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याकडे भक्तांचा कल आहे. शुक्रवार, १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून, त्यासाठी विविध आकारातील आकर्षक गणेशमूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. सोबतच सजावटीसाठी विविध रंगसंगती आणि नक्षीकाम असलेले मखर, विद्युत रोषणाई आदी वस्तूंचीही बाजारपेठेत रेलचेल आहे. यंदाही कोविड-१९च्या सावटाखाली गणेशोत्सव होत असल्याने घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यावर जास्त भर दिला जात आहे. त्यामुळे विक्रेत्यांनीही आकाराने छोट्या गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध असल्याने आकाराने मोठ्या गणेशमूर्तींना काहीशी कमी मागणी आहे. तसेच गतवर्षीपेक्षा यावर्षी गणेशमूर्तीच्या दरामध्ये काहीशी वाढ झाली आहे. मात्र, तरीही गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेते दिलीप शेळके यांनी सांगितले.

-------------------

फोटो ओळी : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बाजारपेठेत आकर्षक गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

Web Title: Ganesh idols were also introduced in the market in Nandurshingote area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.