इदगाह मैदानावर गणेशमूर्तींचे गाळे
By Admin | Updated: August 25, 2016 00:36 IST2016-08-25T00:35:30+5:302016-08-25T00:36:39+5:30
विक्रेत्यांची सहमती : मनपाची गाळे उभारण्यास परवानगी

इदगाह मैदानावर गणेशमूर्तींचे गाळे
नाशिक : गेल्या काही वर्षांपासून त्र्यंबक रस्त्यावरील जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर गणेशमूर्ती विक्रीसाठी थाटण्यात येणारे गाळे यंदा इदगाह मैदानावर उभारण्यात येणार असून, मूर्ती विक्रेत्यांनीही त्यास संमती दर्शविली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून गाळे उभारणीबाबतचा वाद संपुष्टात आला आहे.
येत्या ५ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल होत आहेत. नाशिक-पुणे रोडलगत पौर्णिमा स्टॉपजवळ तसेच गांधीनगर या भागात खासगी जागेत गाळे उभे राहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा रुग्णालयालगत आणि हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानालगतच्या जागेत मूर्ती विक्रीसाठी गाळे उभारण्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालय परिसर हा शांतता क्षेत्र घोषित केलेला असल्याने आणि परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिका व पोलीस प्रशासनाकडून गाळे उभारणीसाठी परवानगी नाकारण्यात येत होती. तरीही परवानगी नसताना गाळेधारकांकडून गाळे उभारले जात होते. दोन वर्षांपूर्वी गाळे उभारणीवरून वाद उद्भवला होता. अखेर महापालिका व पोलीस प्रशासनाला माघार घ्यावी लागली होती. मागील वर्षी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे जिल्हा रुग्णालयाबाहेर गाळे उभारण्यास मनाई करण्यात आली होती. पर्वणीकाळातच गणेशोत्सव आल्याने आणि शहरात लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता मूर्ती विक्रेत्यांनी सहकार्याची भूमिका घेत खासगी जागांचा शोध घेऊन तेथे गाळे उभारले होते. यंदाही महापालिकेने जिल्हा रुग्णालयाबाहेर गाळे उभारण्यास मनाई करतानाच जवळच असलेल्या इदगाह मैदानासह शहरात सुमारे २५० ठिकाणी गाळे उभारणीसंदर्भातील प्रस्ताव पोलीस प्रशासनाला सादर केलेला आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाने गाळे विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर विक्रेत्यांनी यंदा इदगाह मैदानावर गाळे उभारण्यास सहमती दर्शविल्याने गेल्या काही वर्षांपासूनच्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. (प्रतिनिधी)