गांधीगिरी स्टाईल आंदोलन
By Admin | Updated: November 19, 2014 01:47 IST2014-11-19T01:46:53+5:302014-11-19T01:47:18+5:30
गांधीगिरी स्टाईल आंदोलन

गांधीगिरी स्टाईल आंदोलन
उपनगर : उपनगर नाका चौकातील महिनाभरापासून बंद पडलेला हायमास्ट अर्धवट स्थितीत दुरुस्त करून पुन्हा दुरुस्तीच्या कामाला आलेल्या मनपा विद्युत कर्मचाऱ्याला रिक्षाचालक व ज्येष्ठ नागरिकांनी गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी स्टाईल आंदोलन केले.
उपनगर चौकातील हायमास्ट व दत्तमंदिर ते द्वारकापर्यंत १०० हून अधिक पथदीप गेल्या महिनाभरापासून बंद असल्यामुळे सायंकाळनंतर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे महिलांची छेडछाड, टवाळखोरांचा उपद्रव, वाढते अपघात, रस्ता ओलांडताना होणारी गैरसोय आदिंचा सामना लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच करावा लागत आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मनपा विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महामार्गावरील पथदीप व उपनगर चौकातील हायमास्टच्या दुरुस्तीस प्रारंभ केला. मात्र विद्युत साहित्य उपलब्ध नसल्यामुळे हायमास्टच्या दुरुस्तीला महिनाभरानंतर मुहूर्त लागला. हायमास्टची दुरुस्ती होऊनही साहित्याच्या अभावामुळे हायमास्टच्या १२ दिव्यांपैकी सहा दिवे सुरू करण्यातच कर्मचाऱ्यांना यश आले. विद्युत चोक उपलब्ध नसल्याने हायमास्ट पूर्णपणे कार्यान्वित करता येत नसल्याचे मनपा विद्युत कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे दुरुस्तीसाठी आलेल्या मनपा विद्युत कर्मचाऱ्यांना रिक्षाचालक व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी संजय लोखंडे, गजानन मांडे, वैभव पगारे, विशाल गांगुर्डे, गौतम पगारे, मिलिंद केदारे, राम गडाख, रघुनाथ खरात, बाळा सूर्यवंशी, आनंद पगारे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)