छात्रभारतीतर्फे शहरातून गांधीविचार पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST2021-02-05T05:44:31+5:302021-02-05T05:44:31+5:30
नाशिक : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे शनिवारी (दि.३०) शहरातून गांधी विचार पदयात्रा काढण्यात आली. गांधीजींच्या ...

छात्रभारतीतर्फे शहरातून गांधीविचार पदयात्रा
नाशिक : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे शनिवारी (दि.३०) शहरातून गांधी विचार पदयात्रा काढण्यात आली. गांधीजींच्या विचारांचा आणि कल्पनांचा पुरस्कार करत तसेच गांधीजींना शेतीविषयक, कामगारविषयक अभिप्रेत योजनांची उजळणी या पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात आली.
शांतता, अहिंसा व बंधुभाव हे महात्मा गांधीजींचे विचार तरुण पिढीत रुजविण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या या गांधीविचार पदयात्रेत सद्यस्थितीत शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांचे विविध प्रश्न व समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. देशाचा कणा समजला जाणारा शेतकरीवर्ग असून शेतकरी, कामगार, विद्यार्थी, त्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन करीत असताना सत्ताधारी पक्ष हिंसेच्या माध्यमातून अशी आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत गांधी यात्रेतून केंद्रातील सत्ताधारी भाजपाला शांतता व अहिंसेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले. पदयात्रेत कामगार नेते राजू देसले, ॲड.अरुण दोंदे, निशिकांत पगारे, स्वप्निल घिया, महेंद्र नाकील, पद्माकर इंगळे, छात्रभारतीचे राकेश पवार, समाधान बागुल, सदाशिव गणगे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्फो
‘महात्मा गांधी अमर रहे’ च्या घोषणा
गांधीविचार पदयात्रेस ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे, फादर वेन्सी डिमेलो यांनी भारताचा तिंरगा दाखवून सुरुवात केली. सहभागी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी अमर रहेच्या घोषणा देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा शालीमार येथून ते संत गाडगेबाबा पुतळा मेनरोड येथे पदयात्रेचा समारोप केला. पदयात्रेत शेतकरी, कामगार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पेहराव करून शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला होता.
(फोटो- ३० पीएचजेएन८९)