वीज यंत्रणेचा खेळखंडोबा
By Admin | Updated: March 2, 2015 00:04 IST2015-03-01T23:58:54+5:302015-03-02T00:04:57+5:30
दुरुस्ती कामांची पोलखोल : विजेबरोबरच अभियंतेही गायब; ग्राहक झाले हैराण

वीज यंत्रणेचा खेळखंडोबा
नाशिक : देखभाल दुरुस्तीसाठी दर शनिवारी वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणने इतक्या दिवसांत काय ‘दिवे’ लावले आहेत याची
पोलखोल किरकोळ पावसानेच केली आहे. थोड्याशा पावसानेही संपूर्ण शहरातील वीज यंत्रणा कोलमडून पडल्याने ग्राहकांना दोन दिवसांपासून अंधारात रहावे लागत असून, विजेबरोबरच अधिकारीही गायब असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे. अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. काही भागात तर कालपासून खंडित असलेला वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी दुपारी सुरू झाला, तर काही ठिकाणी वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. नेमका बिघाड कुठे आहे? वीज कधी येणार? याची कोणतीही माहिती ग्राहकांना मिळत नसल्याने विजेबरोबरच अधिकारीही गायब असल्याने महावितरणच्या या कारभाराविषयी ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
शनिवारी शहर परिसरातील अनेक भागांतील फिडर्स नादुरुस्त होते, कुठे कंडक्टर बंद झाले, तर कुठे वाहिन्या तुटल्या. त्यामुळे तासंतास वीजपुरवठा गायब झालेला होता. अशा परिस्थितीत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी काय करतात याची माहिती सर्वसामान्यांना मिळणे कठीण झाल्याने अनेकांनी वर्तमानपत्रांच्या कार्यालयात चौकशी केली. प्रसारमाध्यमांसमोर काही अभियंते आले, मात्र शहरात कुठेही मोठा बिघाड नसल्याचा दावा त्यांनी केला व दहा तासांपेक्षा अधिक तास खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना झाला.
शनिवारी महात्मानगर, सिडको, सातपूर, गंगापूररोड, अशोकस्तंभ, कॉलेजरोड, पाटीललेन या भागातील वीजपुरवठा खंडित असतानाही अभियंत्यांकडून इन्कार करण्यात येत होता. तसेच उंटवाडी, देवळाली कॅम्प, उपनगर, टाकळी, बिटको चौक, जैन भवन परिसर, आर्टिलरी सेंटर या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. जेलरोड,राजराजेश्वरी भागातही आठ तासापेक्षा अधिक काळ वीज गायब होती.