शासनाच्या नियमांवर भाषेचे भवितव्य अवलंबून नाही

By Admin | Updated: February 27, 2017 01:33 IST2017-02-27T01:33:36+5:302017-02-27T01:33:56+5:30

नाशिक : मराठी भाषेचे भवितव्य शासनाच्या नियमावर अवलंबून नाही,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी ‘विशाखा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.

The future of language does not depend on the rules of government | शासनाच्या नियमांवर भाषेचे भवितव्य अवलंबून नाही

शासनाच्या नियमांवर भाषेचे भवितव्य अवलंबून नाही

उत्तम कांबळे : मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला विशाखा पुरस्कार सोहळ्याचे वितरण
नाशिक : मराठी भाषेवर गंभीर चर्चा होत नाही ही मराठी भाषेची शोकांतिका आहे. मराठी भाषेचे भवितव्य शासनाच्या नियमावर अवलंबून नाही, तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कितपत चर्चा केली जाते यावर अवलंबून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार उत्तम कांबळे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे आयोजित ‘विशाखा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले. महाकवी कालिदास मंदिर येथे रविवारी (दि. २६) या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीचे विशाखा पुरस्कार योगिनी सतारकर - पांडे (नांदेड), मोहन कुंभार (सिंधुदुर्ग) आणि विष्णु थोरे (चांदवड, नाशिक) यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उत्तम कांबळे यांनी पुढे बोलताना जागतिकीकरणामुळे तसेच खासगीकरणामुळे समाजापुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. तसेच ती मराठी भाषेपुढेदेखील आहेत. भाषेशी असलेल्या नातेसंबंधांवर भाषेचे भविष्य अवलंबून असल्याचे कांबळे यांनी यावेळी सांगितले. भाबडेपणाने भाषेचा व्यवहार करण्यापेक्षा भाषा संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे याकडे कांबळे यांनी यावेळी लक्ष वेधले. मनोगत व्यक्त करताना पुरस्कारार्थींनी आपली जबाबदारी अधिकच वाढली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे यांनी केले, तर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण केंद्राच्या संचालक डॉ. विजया पाटील यांनी विशाखा पुरस्काराविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी आपल्या मनोगतातून पुरस्कारप्राप्त कवींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले. (प्रतिनिधी)
हे पुरस्कारार्थी सन्मानित
विशाखा पुरस्काराअंतर्गत यावर्षीचा प्रथम पुरस्कार नांदेड येथील कवयित्री डॉ. योगिनी सातारकर - पांडे यांच्या ‘जाणिवांचे हिरवे कोंभ’ या कविता संग्रहाला मिळाला. एकवीस हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. द्वितीय पुरस्कार सिंधुदुर्ग येथील कवी मोहन कुंभार यांच्या ‘जगण्याची गाथा’ या काव्यसंग्रहास मिळाला. पंधरा हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तर तिसरा क्रमांक चांदवड, नाशिक येथील कवी विष्णू थोरे यांच्या ‘धूळपेरा उसवता’ या काव्यसंग्रहाला मिळाला. दहा हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Web Title: The future of language does not depend on the rules of government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.