फ्युजन, जसरंगी अन् जुगलबंदी!
By Admin | Updated: March 18, 2015 00:28 IST2015-03-18T00:28:00+5:302015-03-18T00:28:11+5:30
रंग त्रितालाचे : संगीत महोत्सवात तिहेरी पर्वणी; पं. विजय घाटे, पं. भवानीशंकर यांच्या वादनाने रसिक तृप्त

फ्युजन, जसरंगी अन् जुगलबंदी!
नाशिक : पाश्चिमात्त्य व भारतीय संगीताच्या मिलाफातून रंगलेले तबला सहवादन...त्यानंतर ख्याल गायनाची अनोखी ‘जसरंगी’ अन् तबला, पखवाज व संवादिनीच्या जुगलबंदीने गाठलेला कार्यक्रमाचा कळस... नाशिककर संगीत रसिकांना ही तिहेरी पर्वणी लाभल्यानंतर प्रत्येकाची अवस्था ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशीच झाली...
निमित्त होते एसडब्ल्यूएस फायनान्शियल व श्री गुरुकृपा तबला परफॉर्मिंग अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंग त्रितालाचे’ या कार्यक्रमाचे. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना पं. जयंत नाईक यांची होती. कार्यक्रमाचा प्रारंभ श्री गुरुकृपा अकादमीच्या विद्यार्थ्यांच्या ‘फ्युजन’ तबला सहवादनाने झाली. पाश्चिमात्त्य व भारतीय संगीताचा त्यात सुरेख मिलाफ साधण्यात आला. तबल्यावर घराणे पद्धतीने पेशकार, कायदे, पारंपरिक बंदिशी अन् ड्रम, झेंबेची लयकारी यातून निघणारा नाद रसिकांची दिलखुलास दाद घेऊन गेला. त्याच्या साथीला होते बासरी, गिटारचे स्वर अन् गायन... निमिष घोलप, ओंकार भुसारे, प्रद्युम्न शेजवळकर, ओंकार अपस्तंभ, बल्लाळ चव्हाण, आदित्य कुलकर्णी, शौनक राजहंस, व्यंकटेश तांबे, उमेश खैरनार यांनी तबलावादन केले, तर ज्ञानेश्वर कासार (गायन), सुभाष दसककर, ईश्वरी दसककर (संवादिनी), अनिरुद्ध भूधर (गिटार), मोहन उपासनी (बासरी) यांनी साथ केली.
प्रारंभी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, सिन्नरचे त्र्यंबकबाबा भगत, गजानन सराफ, भास भामरे, रघुवीर अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रा. अविराज तायडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. गायन, वादनामुळे आनंदाची निर्मिती होते आणि आनंद हे देवाचे रूप असते. सध्याच्या तणावाच्या वातावरणात पूर्वीप्रमाणे कीर्तनांसारखी एकत्र आनंद लुटण्याची संधी मिळत नाही; मात्र यानिमित्ताने ती चालून आल्याचे ते म्हणाले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)