खंडित वीजपुरवठ्याने संताप
By Admin | Updated: March 4, 2017 00:33 IST2017-03-04T00:33:44+5:302017-03-04T00:33:57+5:30
सिन्नर: यावर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने विहिरींना पाणी आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे.

खंडित वीजपुरवठ्याने संताप
सिन्नर : गेल्या सहा ते सात वर्षापासून लागोपाठ पडलेल्या दुष्काळाने सिन्नर तालुक्यातील पूर्वभागातील शेतकरी होरपळला असताना यावर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने विहिरींना पाणी आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य होत असून, डोळ्यादेखत पिके करपून जाण्याची वेळ आहे.
या पार्श्वभूमीवर सुरळीत वीजपुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
वीज आल्यानंतर एकाच वेळी अनेक वीजपंप सुरू होतात. कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रकार होत आहेत. एकाच परिसरातील एका वेळी १० ते १५ वेळेस रोहित्र जळण्याचे प्रकार घडले आहेत. जळालेल्या रोहित्राचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास आठ दिवस पोहोचत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. अनेक गावांमध्ये तारतंत्री नसल्याने या गावांना वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, पंचायत समिती सदस्य विजय गडाख, योगीता कांदळकर, तातू जगताप, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण वाघ यांनी वीज वितरण कंपनीचे सिन्नर येथील अभियंता विनायक इंगळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मिठसागरे ग्रामपंचायतीचे सदस्य बाबासाहेब कांदळकर, बाळासाहेब साळुंके, भानुदास घुगे, प्रकाश आव्हाड, किरण बलक, रोशन गोळेसर, संदीप लोणारे, सुनील रानडे, सुकदेव गडाख, रमेश गवळी, लक्ष्मण कुंभार, अनिल घुमरे, शिवाजी तळेकर, रवींद्र गिते, जयराम थोरात, चंद्रभान थोरात, शरद गव्हाणे, योगेश घोटेकर, नारायण सापनर, भागवत सापनर, राजाराम घुमरे, दिलीप घुमरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)