सप्तशृंगगडावर फ्युनिक्यूलर ट्रॉलीची चाचणी
By Admin | Updated: May 3, 2016 00:39 IST2016-05-02T23:02:02+5:302016-05-03T00:39:13+5:30
सप्तशृंगगडावर फ्युनिक्यूलर ट्रॉलीची चाचणी

सप्तशृंगगडावर फ्युनिक्यूलर ट्रॉलीची चाचणी
कळवण/सप्तशृंगगड : आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी गडावर फ्युनिक्यूलर ट्रॉली उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. फ्युनिक्यूलर ट्रॉली या ट्रॅकवर चढविल्या असून, त्यांची चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने गडाचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
कोलकाता येथून ट्रॉली आणण्यात आल्या असून, संपूर्णपणे वातानुकूलित या ट्रॉलीला जाण्या-येण्यासाठी कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत व चाचणी घेण्यासाठी परदेशातून अभियंते बोलविण्यात आले आहेत. त्यासाठी अंदाजे एक ते दोन महिने या ट्रॉलीची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती सुयोग गुरुबक्षाणी कंपनीचे व्यवस्थापक राजू लुंबा यांनी दिली.
फ्युनिक्यूलर ट्रॉली हा देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. यामुळे महिला, अपंग वृद्ध, भाविकांची गैरसोय थांबून त्यांचा मंदिरापर्यंतचा प्रवास सुखकर आणि अवघ्या तीन मिनिटात होणार आहे.
सप्तशृंग देवीचे मंदिर डोंगरकड्यांच्या मध्यभागी आणि पायथ्यापासून १०० मीटर उंचीवर असून, भाविकांना मंदिरात ५५० पायऱ्या उंच चढून जावे लागते.
गडावर जाण्यासाठी वृद्ध, अपंग, आजारी, गर्भवती महिलांना त्रासदायक ठरत आहे. सदर भाविकांना सुलभ पर्याय म्हणून फ्युनिक्यूलर ट्रॉलीचा पर्याय शोधण्यात आला. ही ट्रॉली १.५ मीटर रुंदीच्या आणि २५० मीटर लांबीच्या रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रेनसारखी असणार आहे. येण्या-जाण्याच्या अशा दोन मार्गावर प्रत्येकी एक ट्रॉली धावणार आहे.