शहीद ठोक यांच्यावर अंत्यसंस्कार
By Admin | Updated: September 20, 2016 00:25 IST2016-09-20T00:25:10+5:302016-09-20T00:25:37+5:30
वीरमरण : खडांगळी गावावर पसरली शोककळा

शहीद ठोक यांच्यावर अंत्यसंस्कार
सिन्नर/वडांगळी : काश्मीर खोऱ्यातल्या उरी शहरातील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तालुक्यातील खडांगळी येथील जवान संदीप सोमनाथ ठोक (२५) यांना वीरमरण आले. खडांगळी येथील देवनदी तीरावर सोमवारी रात्री उशिरा शहीद संदीप यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरी झाडून शहीद संदीप यांना सलामी देण्यात आली. यावेळी अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या हजारो नागरिकांना अश्रू अनावर झाले होते. संदीप यांना वीरमरण आल्याची वार्ता सिन्नर तालुक्यात सोमवारी पहाटे आली. या दु:खद बातमीमुळे तालुक्यावर शोककळा पसरली. खडांगळी ग्रामस्थांनी सकाळपासून स्वयंस्फूर्तीने बंद पाळून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. ठोक यांच्या वस्तीवर नातेवाईक व ग्रामस्थ सकाळपासून रात्री नऊ वाजेपर्यंत बसून होते. (पान २ वर) विशेष शासकीय विमानाने संदीप यांचे पार्थिव ओझर विमानतळावर आणण्यात आले. ओझर विमानतळावर राज्यमंत्री दादा भुसे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सौ. ?? महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, जयवंत जाधव, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह लष्करी अधिकारी, महसूल व विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी आदरांजली अर्पण केली. ओझर विमानतळावरुन लष्करी वाहनाद्वारे शहीद संदीप यांचे पार्थिव सिन्नर तालुक्यातल्या खडांगळी येथील ठोक वस्तीवर आणण्यात आले. संदीप यांचे पार्थिव घरी येताच कुटूंबीय व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. सजविलेल्या रथातून संदीप यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. भारत माता की जय, संदीप ठोक अमर रहे! या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महिलांनी अंत्ययात्रेच्या मार्गावर सडासंमार्जन करुन रांगोळ्या काढल्या होत्या. स्मशानभूमी फुलांनी सजविण्यात आली होती. हजारो नागरिक शोकसागरात बुडाल्याचे दिसून येत होते. रात्री उशिरा देवनदीच्या तीरावर खडांगळी स्मशानभूमीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संदीप यांना अग्निडाग देण्यात आला. लष्कर व पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली. शहीद संदीप यांच्या पश्चात आजी, वडील सोमनाथ, आई विमल, भाऊ योगेश (भानुदास), वहिनी, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. (वार्ताहर) चौकट - दिवसभर संदीपच्या येण्याची प्रतीक्षा सोमवारी पहाटे संदीप ठोक यांना वीरमरण आल्याची वार्ता खडांगळी पोहचली होती. खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे यांच्यासह अनेक लोकप्रतिनीधी व शासकीय अधिकारी खडांगळी येथे पोहचले होते. ठोक कुटूंबीय, नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थांच्या नजरा संदीप यांचे पार्थिव खडांगळी गावात येण्याकडे लागून राहिल्या होत्या. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून हल्ल्याचा निषेध केला होता. दिवसभर स्मशानभूमी परिसरात साफसफाई मोहीम राबविण्यात आली व अंत्यविधीला येणाऱ्या हजारो नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली. २ फोटो क्र. - 19२्रल्लस्रँ09 & 10 फोटो ओळी - शहीद संदीप ठोक फोटो क्र. - 19२्रल्लस्रँ11 फोटो ओळी - सिन्नर तालुक्यातल्या खडांगळी येथे शहीद संदीप ठोक यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नागरिक. चौकट - वरातीऐवजी अंत्ययात्रेत सहभागी होण्याची वेळ! दोन वर्षापूर्वी सैन्यात भरती झाल्यापासूनच ठोक कुटूंबियांनी संदीप यांच्या विवाहाची चर्चा सुरु केली होती. तथापि, संदीप यांनी काही दिवस थांबण्याचा निर्णय घेतला होता. कुटूंबियांनी वारंवार आग्रह केल्याने संदीप यांनी यंदा विवाह करण्यास सहमती दर्शविली होती. त्यानुसारच येत्या २८ सप्टेंबरला घरी आल्यानंतर लगेचच मुलगी बघायला जाण्याचे नियोजन ठोक कुटूंबियांनी केले होते. मात्र, तत्पूर्वीच संदीप यांना वीरगती प्राप्त झाल्याने विवाहाच्या वरातीत सहभागी होण्याचे स्वप्ने रंगविलेल्या ठोक कुटूंबीय व मित्र परिवाराला अंत्ययात्रेत सहभागी होण्याची वेळ आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.