भांडवली कामांसाठी निधीची चणचण
By Admin | Updated: September 11, 2016 02:02 IST2016-09-11T02:01:55+5:302016-09-11T02:02:07+5:30
मनपा पेचात : एलबीटीपोटी ३५० कोटी उत्पन्न जमा

भांडवली कामांसाठी निधीची चणचण
नाशिक : महापालिकेचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी महासभेने १७६१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केले असले तरी आता त्यातील तरतुदींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. गेल्या पाच महिन्यांत महापालिकेला एलबीटीपोटी ३५९ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले असून, वर्षअखेर उत्पन्न ८५० कोटी रुपयांच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भांडवली कामांसाठी निधी उपलब्ध होईल की नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. परिणामी, यंदाही विकासकामे रखडण्याची भीती आहे.
महापालिकेची एकूणच खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता महासभेने यंदाच्या अंदाजपत्रकात केवळ २३.५५ कोटी रुपयांची अल्पशी वाढ सुचविणे पसंत केले आहे. डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीतील दुसरे अंदाजपत्रक सादर करताना जमा आणि खर्च बाजूचा विचार करत १३५७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायीला सुपूर्द केले होते. त्यात महापालिकेचा बंधनात्मक खर्च ७८३ कोटी रुपये, सिंहस्थ कामांसाठी महापालिकेचा हिस्सा २० कोटी, जे.एन.एन.यू.आर.एम. प्रकल्पासाठी ७६ कोटी, मुकणे धरणातील थेट पाइपलाइनसाठी ५० कोटी, जमीन संपादनाकरिता मनपाचा निधी ५० कोटी, १९ टक्के राखीव निधी ६१.६५ कोटी आहे.