कार्यशील शिक्षकांचे आनंददायी शिक्षण !

By Admin | Updated: July 25, 2014 00:34 IST2014-07-24T23:38:50+5:302014-07-25T00:34:59+5:30

अनुभूती : प्रत्यक्ष सादरीकरणाने नामपूरच्या विद्यार्थ्यांत शिक्षणाची गोडी

Functional teacher's fun learning! | कार्यशील शिक्षकांचे आनंददायी शिक्षण !

कार्यशील शिक्षकांचे आनंददायी शिक्षण !

नामपूर : ग्रामीण भागातील आणि त्यातल्या त्यात जिल्हा परिषदेच्या शाळेबाबतचे आजचे समाजातील चित्र सर्वश्रुत आहे. या समाजमनाला छेद देण्याचा प्रयत्न नामपूरच्या शिक्षकांनी केला आहे. विद्यार्थ्यांत शिक्षणाबाबत आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी राबविलेल्या प्रत्यक्ष सादरीकरणाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांत शिक्षणाविषयी आपुलकी, गोडी निर्माण होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहात टिकून शालेय परिसरात रममाण व्हावेत या भूमिकेतून पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाने प्राथमिक शैक्षणिक अभ्यासक्रमात ग्रामीण आदिवासी बोली भाषेतील गाण्यांचा अंतर्भाव केला आहे. बोली भाषेतील गाणे अभ्यासक्रमात असल्यामुळे विद्यार्थ्यांत शिक्षणाविषयी आपुलकी निर्माण होते. त्याच अनुषंगाने आदिवासी, बिलोरी भाषेतील ‘धोंडी धोंडी पाणी दे... साय माय पिकू दे...’ हे गीत पहिलीच्या भाषा विषयात समाविष्ट केले आहे. हे गाणे नामपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक संतोष सावंत, पांडुरंग सावळा, नितीन सोनवणे, सुगंध भदाणे यांनी विद्यार्थ्यांसह सादरीकरण करत प्रत्यक्ष प्रसंगातून विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट करून सादर केले. पंधरा विद्यार्थ्यांच्या अंगाभोवती कडूनिंबाच्या डहाळ्या बांधत या शिक्षकांनी शाळेतील वाद्यांचा वापर करत प्रांगणात नाचतगात शिक्षणाविषयी आपुलकी निर्माण केली. विद्यार्थ्यांनीही पर्जन्यराजाला साद घालताना एकच जल्लोष केला.उपक्रमास जिल्हा परिषद सदस्य सुनीता पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब सावंत, संभाजी सावंत, केंद्रप्रमुख अशोक पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेने आषाढीनिमित्त गावातून दिंडी, शिवजयंतीनिमित्त दोनशे मावळ्यांची मिरवणूक काढली होती. पर्यावरण पूरक होळी, गाव व परिसरात वृक्षारोपण, कविसंमेलन, महिलादिन या उपक्रमांनाही असाच प्रतिसाद लाभला होता.मुख्याध्यापक लता महाले, ज्योती गायकवाड, अर्चना अहिरे, साधना पाटील यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)

Web Title: Functional teacher's fun learning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.