...अखेर तीन दिवसांनतर नाट्याला पूर्णविराम
By Admin | Updated: April 27, 2017 01:14 IST2017-04-27T01:14:40+5:302017-04-27T01:14:50+5:30
घोटी : सिनेमाला साजेशी अशी प्रेमकथा इगतपुरी विपश्यना विश्व विद्यापीठ (धम्मगिरी) येथे आलेल्या एका परदेशी साधक महिलेने प्रत्यक्षात साकारली

...अखेर तीन दिवसांनतर नाट्याला पूर्णविराम
घोटी : सिनेमाला साजेशी अशी प्रेमकथा इगतपुरी शहरात विपश्यना विश्व विद्यापीठ (धम्मगिरी) येथे आलेल्या एका परदेशी साधक महिलेने प्रत्यक्षात साकारली. ही प्रेमिका (साधक) दोन दिवसांपासून प्रियकराच्या विरहात धम्मगिरीच्या प्रवेशद्वाराजवळ प्रियकराची वाट पाहताना दिसून आल्याने इगतपुरी शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांनी मध्यस्थी करून तिला जाण्यास सांगूनदेखील ती पुन्हा आल्याने धम्मगिरी विश्वस्त हैराण झाले आहेत.
इगतपुरी शहरातील धम्मगिरी येथे दरवर्षी हजारो परदेशी नागरिक साधनेसाठी येत असतात. १० वर्षांपासून न्यू यॉर्क, अमेरिका येथून कॅतरिन ऊर्फ जानकी (४४) नामक महिलादेखील साधना करण्यासाठी म्हणून येते. या ठिकाणी सेवा करत असताना अग्रवाल (धम्मगिरीतील सेवक, रा. दिल्ली) नामक व्यक्तीच्या प्रेमात ती कशी पडली. ती इतकी प्रेम वेडी झाली की ती नेहमी या व्यक्तीच्या संपर्कात येण्यासाठी काहीही करण्यास तयार होत असे. दरम्यान, शुक्र वारी (दि. २१) या परदेशी पाहुणीला धम्मगिरीच्या प्रवेशद्वारावर चिंताग्रस्त पाहून अनेक नागरिकांना प्रश्न पडला. विचारपूस केली असता ही सेवक असून, तिला काही कारणास्तव प्रवेश बंद असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. दरम्यान विश्वस्तांनी तिची समजूत काढून तिला घरी जाण्यास सांगितले. मात्र, तिने या गोष्टीला नकार देत मी प्रियकराची गेटवरच वाट पाहते असे सांगून ठिय्या मांडला.
धम्मगिरी प्रशासनाने शनिवारी पोलिसांना ही सर्व हकीगत सांगत मदत मागितली. सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे यांनी तिला समजून सांगितले व रेल्वेस्थानकात सोडल्यानंतर पोलीस व धम्मगिरी व्यवस्थापकांनी मोकळा श्वास घेतला. मात्र रविवारी सकाळी ती पुन्हा प्रवेशद्वाराजवळ चिंताग्रस्त अवस्थेत दिसल्याने संबंधित व्यवस्थापकाची तारांबळ उडाली. पुन्हा दुपारच्या सुमारास पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी पुन्हा तिची समजूत घालत घरी जाण्यास सांगून धम्मगिरी परिसरात येण्यास मनाई केली.
दरम्यान, हे प्रेमनाट्य गत १० ते १५ दिवसांपासून सुरू असून, सदर विदेशी प्रेमिका रोज दिवसभर प्रवेशद्वारजवळ तर रात्री झोपण्यासाठी खासगी लॉजमध्ये जात असल्याची माहिती समोर आली आहे. ही साधक महिला पुन्हा या विपश्यना केंद्रात येऊ नये हीच अपेक्षा विश्ववस्तानी व्यक्त केली आहे.
इगतपुरी शहरातील विपश्यना विश्व विद्यापीठ (धम्मगिरी) येथे अमेरिकतून आलेल्या सेविकेने सोमवारी पुन्हा एकदा आक्र मक पवित्रा घेत धम्मगिरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; मात्र सुरक्षा रक्षकांच्या सावधगिरीने तिचा प्रयत्न फसला. तिने मुख्य प्रवेशद्वाराकडून पळ काढत धम्म तपोवन गेटकडे मोर्चा वळवल्याने ही विदेशी सेविका प्रेमप्रकरणावरून पुन्हा चर्चेत आली होती.
विदेशातून आलेल्या साधिकेने १५ दिवसांपासून सुरू केलेल्या एकतर्फी प्रेमप्रकरणाचा शेवट सोमवारी रात्री संपुष्टात आला. तिचा प्रियकर तिच्यासमोरून धम्मगिरीतून निघून गेल्याने, तीदेखील मुंबईला रवाना झाली. मात्र, प्रियकर तिच्या समोरून जात असताना तिचे पानवलेले डोळे पाहून उपस्थिताना गहिवरून आले. विश्वस्तांनी तिची समजूत काढून तिच्या घरी जाण्यास सांगितले. मात्र, तिने नकार देत मी प्रियकराची गेटवरच वाट पाहते, असे सांगून ठिय्या मांडला होता. दरम्यान, अनेक दिवस होऊनही ती जात नसल्याने अखेरीस धम्मगिरीने पोलिसांची मदत घेतली. वेळोवेळी प्रवेश नाकारूनही ती प्रवेशद्वाराजवळ येत असल्याने अखेरीस धम्मगिरी व्यवस्थापकांनी पोलिसांची मदत घेत संबंधित प्रियकर विजय अग्रवाल याला सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास धम्मगिरी सोडण्यास सांगितले.
विजय अग्रवालने ही या गोष्टीला कंटाळून काढता पाय घेतला. तो हे केंद्र सोडून जात असल्याचे कॅटरिनला दाखवण्यासाठी तिला प्रवेशद्वाराजवळ उभे करण्यात आले होते. तो जात असताना पाहून तिचे डोळे पाणावले होते. थोडा वेळ स्तब्ध राहत ती एकदम शांत झाली.
दरम्यान, पोलिसांनी तिची समजूत घालत तिला रेल्वेस्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या गाडीत बसून दिले. अखेरीस या एकतर्फी प्रेम कहाणीचा शेवट झाल्याने विश्वस्त व पोलिसांनी मोकळा श्वास घेतला. आता ती पुन्हा येथे येऊ नये ही अपेक्षा धम्मगिरी प्रशासनाने व्यक्त केली आहे. (वार्ताहर)