राज्यात २० पासून इंधन दर कमी
By Admin | Updated: August 9, 2015 22:28 IST2015-08-09T22:28:20+5:302015-08-09T22:28:57+5:30
राज्यात २० पासून इंधन दर कमी

राज्यात २० पासून इंधन दर कमी
मालेगाव कॅम्प : पेट्रोल व डिझेल वरील एलबीटी रद्द होऊन लवकरच या वस्तूंवर सुधारित कर प्रणाली आकारून यावरील दरांवर नियंत्रण येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रेत्यांना दिले. त्यामुळे येत्या २० तारखेपासून राज्यासह मालेगावी इंधन दर कमी होतील, असे जिल्हा पेट्रोल, डिझेल असोसिएशनचे उपाध्यक्ष भूषण भोसले यांनी सांगितले.
राज्यात १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्यात आला. अनेक उद्योग- धंद्यांवर हा नियम लागू झाला; परंतु काही तांत्रिक मुद्द्यांमुळे पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी रद्द करण्यास शासनाने नकार दिला होता. त्यामुळे पेट्रोल विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली व त्यांनी येत्या १० आॅगस्टपासून बेमुदत बंदचे आयोजन केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र डिलर असोसिएशनच्या प्रमुख नेत्यांशी याबाबत चर्चा झाली. चर्चेत प्रामुख्याने पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी, एसएससी (स्टेट स्पेसिफिक सरचार्ज), व्हॅटच्या करांवर सकारात्मक चर्चा झाली.
संघटनेतर्फे प्रामुख्याने दोन मागण्या मांडल्या. यात पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी स्थानिक व्हॅट ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३०० कोटी रुपयांच्या आत आहे हे कर महाराष्ट्रात जीवनावश्यक म्हणून रद्द करावे ज्यामुळे राज्यातील महापालिकांमधील शहरांमध्ये जनतेला ३ ते ५ रुपयांनी इंधन स्वस्तात मिळेल. तर एसएससी (स्टेट स्पेसिफिक सरचार्ज) हा कर महाराष्ट्रातच इंधन निधीवर आकारला जातो. त्यामुळे लांब पल्ल्यांची वाहने शेजारील राज्यात इंधन भरतात. यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे शासनाने एलबीटी, एसएससी कर रद्द करावेत. मुख्यमंत्र्यांनी येत्या २० तारखेला याबाबत निर्णय घेऊन कर कमी करण्याचे संकेत दिले. (वार्ताहर)