विनाअनुदानित शाळांच्या विविध मागण्यांसाठी अधिवेशनावर मोर्चा
By Admin | Updated: November 18, 2015 22:27 IST2015-11-18T22:27:01+5:302015-11-18T22:27:54+5:30
विनाअनुदानित शाळांच्या विविध मागण्यांसाठी अधिवेशनावर मोर्चा

विनाअनुदानित शाळांच्या विविध मागण्यांसाठी अधिवेशनावर मोर्चा
नाशिक : राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक अनुदानास पात्र असलेल्या शाळांना आणि अतिरिक्त तुकड्यांना निधीची तरतूद करावी, त्याचप्रमाणे अनुदानास पात्र घोषित न झालेल्या खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना हिवाळी अधिवेशनापूर्वी अनुदान मंजूर करावे, या आणि इतर मागण्यांसाठी अमरावती येथील विधान परिषदेचे आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार दत्तात्रय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव ते नागपूर अशा पायी दिंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पंधरा ते सोळा वर्षांपासून सातत्याने सरकारने शिक्षकांच्या भावनांशी खेळत असून, निधीचा तुटवडा असल्याचे सांगत वेळोवेळी आश्वासने देऊन हा प्रश्न खितपत ठेवला जात असल्याचे मत देशपांडे यांनी यावेळी व्यक्तकेले. वारंवार निवेदने आणि आंदोलने करूनही काहीही उपयोग होत नसल्याने हा निर्णायक लढा देण्याचा निर्धार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि शिक्षक आघाडीतर्फे शेगाव, जि. बुलढाणा येथून मंगळवार (दि.१) डिसेंबरपासून या मोर्चाला सुरुवात होणार असून, हा मोर्चा शुक्रवार (दि.११) हिवाळी अधिवेशनात धडकणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील शिक्षकांनी सामील होण्याचे आवाहन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केले. (प्रतिनिधी)