सिन्नरला भरपावसात मोर्चा
By Admin | Updated: September 27, 2016 00:37 IST2016-09-27T00:36:33+5:302016-09-27T00:37:06+5:30
पाकविरोधात घोषणाबाजी : शहिदांना श्रद्धांजली

सिन्नरला भरपावसात मोर्चा
सिन्नर : पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून कश्मीर खोऱ्यातील उरी येथील लष्करीतळावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शहरातील मुस्लीम समाजबांधवांनी मोर्चा काढला. भरपावसात निघालेल्या या निषेध मोर्चात शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते.
दुपारी नमाजपठण झाल्यानंतर काजीपुऱ्यातून मोर्चास प्रारंभ झाला. शिवाजी चौकात माजी उपनगराध्यक्ष अॅड. इलियास खतिब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या मोर्चात विद्यार्थी, तरुण, वृद्धांसह शेकडो मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. गणेशपेठ, लालचौक ते वाचनालय मार्गाने मोर्चा शिवाजी चौकात आला. या ठिकाणी पाकिस्तान सरकार विरोधात घोषणाबाजी करत घटनेचा निषेध करण्यात आला. संतप्त तरुणांनी पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करीत पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा प्रतीकात्मक पुतळा पायाखाली तुडवून रोष व्यक्त केला.
पाकिस्तान सरकार दहशतवादी कृत्यांना खतपाणी देत आहे. वारंवार छुपे हल्ले करून देशात अशांतता व दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारत सरकारने यास सडेतोड उत्तर द्यावे. पाकच्या कुटिल कारवायांना वेळीच कठोर पावले उचलून उत्तर द्यावे अशी मागणी अॅड. खतीब यांनी यावेळी केली.
निषेध मोर्चात समाजाचे ज्येष्ठ हाजी नसीरभाई मनियार, हाजी सैयद रज्जाक, हाजी अमीन पठाण, रफीक हारुण खतीब, एकबाल अजमोहीन, तै. गुलाब, निसार शेख, मजीदभाई मोमीन, शब्बीर हमिदुल्ला, शेख शब्बीर गुलाब, नजीर मनियार, पप्पू मणियार, मुजाहिद पटेल, लियाकत शेख, साजीद खतीब, मुजाहिद खतीब, रईस हिसामोद्दीन काजी, अरयाज शेख, दिलनवाज कोरबे, सलीम आत्तारी, अजीज हसन, तन्वीर मोमीन यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. (वार्ताहर)