इगतपुरी नगर परिषदेवर कचरा डेपोच्या निषेधार्थ मोर्चा
By Admin | Updated: May 29, 2014 16:27 IST2014-05-28T00:35:18+5:302014-05-29T16:27:32+5:30
कचरा डेपोमुळे गोळीबारवाडीतील आदिवासी-बांधवांचे आरोग्य धोक्यात.

इगतपुरी नगर परिषदेवर कचरा डेपोच्या निषेधार्थ मोर्चा
इगतपुरी : शहरातील गोळीबार मैदान येथील कचरा डेपोमुळे गोळीबारवाडीतील आदिवासी-बांधवांचे आरोग्य धोक्यात आल्याने त्याच्या निषेधार्थ नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. या कचरा डेपोची पावसाळ्याअगोदर जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी आॅफ आठवले गटाचे पदाधिकारी आणि गोळीबारवाडीतील शेकडो महिला-पुरुषांनी एकत्र येऊन मुख्याधिकारी व तहसीलदारांना दिले. शहरातील धम्मगिरीच्या मागे नगर परिषदेचा कचरा डेपो आहे. या कचरा डेपोमुळे गोळीबारवाडीतील आदिवासी नागरिक त्रस्त आहेत. गोळीबारवाडीकडे जाणार्या मुख्य सीमेंट रस्त्यावर कचरा साचत असल्याने वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहे. या कचरा डेपोमुळे जवळच नव्याने वसलेल्या श्री स्वामी समर्थ नगरवासीयांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या डेपोजवळून वाहणार्या नाल्यात हा कचरा जमा झाल्याने नाला तुंबला असून, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर सदर परिसराची साफसफाई करण्यात यावी यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आली आहे.