द्राक्ष उत्पादकांचा मोर्चा
By Admin | Updated: January 5, 2016 23:18 IST2016-01-05T22:59:40+5:302016-01-05T23:18:58+5:30
निफाड : कॅमसन कंपनीकडून फसवणूक

द्राक्ष उत्पादकांचा मोर्चा
निफाड : कॅलनोव्हा औषध वापरल्याने झालेल्या नुकसानीची कॅमसन कंपनीने भरपाई द्यावी, यासाठी निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी सोमवारी मोर्चा काढून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत निवेदन दिले.
निफाड तालुक्यातील खेडे, कारसूळ, खडक माळेगाव, रौळस, दिंडोरी तास, गाजरवाडी, नैताळे, अहेरगाव, पालखेड, पाचोरा, लोणवाडी या गावांतील द्राक्ष उत्पादकांनी ‘कॅमसन कंपनीकडून भरपाई मिळालीच पाहिजे, बंद करा बंद करा कॅमसन कंपनी बंद करा, द्राक्ष उत्पादकांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा मोर्चात दिल्या. मोर्चाचे नेतृत्व देवेंद्र काजळे, माणिक शिंदे यांनी केले. मोर्चाचे तहसील कार्यालयासमोर सभेत रूपांतर
झाले.
माणिक शिंदे यांनी शेतकऱ्यांची कॅमसन कंपनीच्या कॅलनोव्हा औषधामुळे झालेल्या नुकसानीची प्रचलित बाजारभावाने भरपाई मिळावी व कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना तत्काळ कॅमसन कंपनीकडून प्रचलित बाजारभावाने भरपाई द्यावी व कंपनीवर नुकसानीबाबत शासनाने फौजदारी कारवाई करावी अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन अधिक तीव्र करून उपोषण, रास्ता रोको आंदोलन शेतकरी कुटुंबांसह केले जाईल, असा इशारा देवेंद्र काजळे यांनी दिला. शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देऊन कंपनीवर कठोर कारवाईची मागणी केली.
या मोर्चात ज्ञानेश्वर ताकाटे, संजय थेटे, संजय सुराशे, कैलास
शिंदे, प्रकाश पगार, सोमनाथ
कुंदे, योगेश शंखपाळ, मच्छिंद्र
शिंदे, भिका जाधव, मोहन शिंदे, विशाल शिंदे, दीपक गायकवाड, कुंदन बाजारे, सुनील शिंदे, श्रीराम चौधरी, विष्णू शिंदे, सुरेश गहिले, शांताराम शिंदे, आदिंसह शेकडो नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार उपस्थित होते. (वार्ताहर)